दगडफेकीत बसगाडय़ांचे नुकसान; पोलीस यंत्रणेची धावपळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकत राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्याचे पडसाद मंगळवारी नाशिकमध्ये उमटले. राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी निदर्शने व रास्ता रोको केला. शहरात काही बसगाडय़ांवर दगडफेक झाली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.

सोमवारी ईडीच्यावतीने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित नऊ ठिकाणी छापे टाकले. प्रदीर्घ चौकशीअंती समीर भुजबळ यांना अटक केली. ही कारवाई होत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक गोटात तशी शांतता होती. मात्र रात्री उशिरा अटकेची कारवाई झाल्याचे समजल्यावर प्रमुख समर्थक रातोरात मुंबईला रवाना झाले, तर मंगळवारी शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलनाची तयारी सुरू केली. नाशिक शहर, येवला, नांदगावसह अनेक भागांत निदर्शने व रास्ता रोको करण्यात आला. भाजपचे सरकार ‘अच्छे दिन’चे स्वप्न प्रत्यक्षात आणू न शकल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी खोटय़ा कारवाया करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. राजकीय सूडापोटी ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी अंमलबजावणी संचालनालयासह इतर सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील द्वारका आणि अंबड येथे आंदोलन करण्यात आले. विद्यमान सरकार तसेच खा. किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला. भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही ठिकाणी वाहने रोखण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने भुजबळ यांना क्लीन चिट दिली असूनही ही कारवाई केली जात असल्याचा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. भगूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले. पंचवटीतील उड्डाणपुलाखाली आणि कॉलेज रोडवर कार्यकर्त्यांकडून बसगाडय़ांवर दगडफेक करण्यात आली. ग्रामीण भागात येवला, नांदगाव, मनमाड, कळवण, लासलगांव, सटाणा, पिंपळगाव बसवंत आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्य़ात १००हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. येवला हा छगन भुजबळ यांचा तर नांदगाव हा आ. पंकज भुजबळ यांचा मतदारसंघ. या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत या कारवाईचा निषेध केला. येवल्यातील कार्यकर्त्यांनी येवला-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करत सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

नाशिक शहर व जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. नाशिक शहरात बसगाडय़ांवर दगडफेक करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road blocked by sameer bhujbal followers
First published on: 03-02-2016 at 09:29 IST