धुळे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य खात्याचे मंत्री आणि भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने रोहिदास पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला आहे. अभिवादन आणि पुरस्कार प्रदान सोहळा असा हा कार्यक्रम असला तरी रोहिदास पाटील यांचे पुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांच्या राजकीय भविष्यासाठी त्याचे महत्व अधिक आहे. तीन पिढ्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. धुळे जिल्ह्यातून काँग्रेसला एकमेव आमदार मिळाला. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपचे राम भदाणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, कुणाल पाटील यांच्या ताब्यातील संस्थांच्या चौकशाही सुरु झाल्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या आश्चर्यकारकपणे थांबल्या. चौकशांचा ससेमिरा थांबल्याचे समाधान असले, तरी भाजप प्रवेशामुळे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. रोहिदास पाटील यांच्या कुटुंबाला काँग्रेसने काय कमी केले, असा प्रश्न करत काँग्रेस भवनातील बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कुणाल पाटील यांचा राजकीय जीवनाचा पट उघडला होता. काँग्रेसच्या निष्ठावान पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांच्यावर विश्वासघाताचा जाहीर आरोप केला होता.
या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांनी धुळ्यात येण्याची दाखवलेली तयारी केवळ रोहिदास पाटील यांना अभिवादन आणि पुरस्कार सोहळ्यासाठीच नाही तर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कुणाल पाटील यांचे राजकीय अस्तित्व किती आणि कसे भक्कम झाले, हे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते आहे. माजी मंत्री आणि राज्यातील प्रभावशाली राजकारणी म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते. या अनुषंगाने पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा कार्यक्रम ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. या सोहळ्यात लोकनेते रोहिदास पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ प्रकाशित होणार असून या ग्रंथात माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील इतर नेत्यांचे लेख समाविष्ट आहेत,