नाशिक : २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने आता वेग घेतला आहे. प्रशासकीय आणि साधू,-महंत यांच्या बैठका वारंवार होऊ लागल्या आहेत. वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येऊ लागल्या आहेत. या समित्यांमध्ये आपणांस स्थान का नाही, यावरुन नाराजीचे फटाकेही फुटू लागले आहेत. नारावंतांची नाराजी दूर करतााना आता प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. कुंभमेळ्यात साधू, महंत नाराज होणार नाहीत, यासाठी अधिक जपावे लागते. त्यासाठी किरकोळ वादही कारणीभूत ठरत असतात. कुंभमेळ्यास अद्याप दीड वर्षांचा कालावधी असतानाच साधू, महंतांची नाराजी बाहेर येऊ लागली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित बैठकीत एका नवीन विषयावरुन साधू, महंत आक्रमक झाले.
प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू, महंत, वेगवेगळ्या आखाड्यांचे प्रतिनिधी हे नाराज होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असली तरी सरबराईत कुठलीही कमतरता राहिल्यास साधू, महंत जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात, हे दिसून आले आहे. २०२७ चा कुंभमेळा अद्याप दूर असतानाही तयारीच्या पातळीवर साधू, महंतांची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याआधी मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली असता तेथील साथू -महंतांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, नाशिकच्या साधू-महंतांचा या मागणीला आक्षेप आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख योग्य असल्याचे नाशिकच्या साधू-महंतांनी म्हटले होते.
फडणवीस यांनी साधू-महंतांशी सिंहस्थाबाबत चर्चा केली होती. त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचे मुख्य स्थान असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्यातील कार्यक्रमांमध्ये त्र्यंबकेश्वर-नाशिक असा उल्लेख करण्याची सूचना साधू-महंतांनी त्यावेळी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा यावे आणि पाहणी करून कुंभमेळ्याच्या कामांविषयी नियोजन करावे, त्र्यंबकेश्वर येथे गरज असल्यास नियोजनाला अडथळा ठरणाऱ्या वास्तूंची तोडफोड करावी, नुकसान होणाऱ्यांना पुरेपूर मोबदला देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी साधू- महंतांनी केली होती. त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांच्या मागणीस नाशिकमधून विरोध करण्यात आला होता. याआधीही नाशिक-त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला गेला असताना आता असा वाद उकरून काढू नये, असे नाशिकच्या साधू-महंतांचे म्हणणे होते.
या वादाची चर्चा असतानाच राज्य शासनाने स्थापन केलेल्या सिंहस्थ कुंभ शिखर समितीत स्थान न दिल्याने साधू-महंत नाराज झाले आहेत. नाराजी व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साधू-महंतांसह १३ आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती. शिखर समितीत महायुतीतील मंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. समितीत कोणत्याही आखाड्याच्या प्रतिनिधींचा समावेश नसल्याचे दिसताच साधू-महंत आक्रमक झाले. शिखर समितीची फेररचना करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर कुंभमेळा नियोजन समितीत समावेश करण्याची मागणी साधू-महंत यांनी केली होती.