नाशिक : नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन योग्य असावे, अमृतस्नान करताना महिला आखाड्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असावी, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी साध्वी त्रिकाल भवन्ता सरस्वती यांनी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले.
साध्वी त्रिकाल भवन्ता सरस्वती यांनी श्री काळाराम मंदिरात दर्शन केले. यावेळी महंत सुधीर पुजारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली. रामकुंड येथील गोदावरीच्या प्रदुषित पाण्याविषयी चिंता व्यक्त केली. रामकुंडाची त्वरित स्वच्छता करण्यासह कुंभमेळ्यात स्वच्छ निर्मळ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्याशी चर्चा केली.
गोदावरी नदीचे पाणी निर्मळ करण्यात यावे, कुंभमेळ्याच्या संगम स्थानापासून नाशिकमधील साधुग्राम आणि त्र्यंबकेश्वर येथे मांसाहारी अन्न आणि मद्य विक्री करणारी सर्व दुकाने बंद करावीत, सर्व विकासकामे जलद पूर्ण करावीत, आदी मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत.