नाशिक – नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडावर ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या मालेगाव तालुक्यातील वाहनाला गडावरील घाट रस्त्यावर अपघात झाला. त्यात युवकाचा मृत्यू तर, ११ जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. सोमवारपासून कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात होत आहे. यानिमित्त रविवारी गडावर ज्योत घेऊन जाण्यासाठी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते वाहनाने निघाले होते. नांदुरी- सप्तशृंग गड दरम्यानच्या घाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटले.

स्थानिकांनी आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात उमेश सोनवणे (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये मोहन मोरे, रवींद्र सोनवणे, प्रवीण सोनवणे, दादाभाऊ भवर, अशोक सोनवणे, साईनाथ सोनवणे, बबलू सोनवणे, बादल सोनवणे, किरण सोनवणे, सुनील सोनवणे यांचा समावेश आहे. याशिवाय काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

नवरात्र उत्सवात सर्वच देवी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत असते. कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंग गडावर राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. सप्तश्रृंगी देवी उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखली जाते. नाशिकसह खान्देशातून भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात. या काळात शेजारील गुजरातमधील भाविकांची संख्या लक्षणीय वाढते. उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीची पंचामृत महापूजा होणार आहे.

सकाळी साडेनऊ वाजता सप्तशृंगी मंदिरात घटस्थापना करत नवरात्रौत्सवाची सुरुवात होईल. उत्सव काळात पालखी पूजन, नगर प्रदक्षिणा, शतचंडी याग, होमहवन, पूजा, कीर्ती ध्वजाची मिरवणूक, सप्तशृंगी देवीच्या शिखरावर ध्वजारोहण, महापूजा आदी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी ट्रस्ट, ग्रामपंचायत, जिल्हा व पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने तयारी केली आहे. वाहनतळ, आरोग्य, पाणी आदींचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवासाठी साधारणत २० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.