लोकसत्ता वार्ताहर

धुळे : आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह जंगलग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नंदुरबारहून निघालेला पायी बिर्‍हाड महामोर्चा १० डिसेंबरला रात्री धुळ्यात धडकणार असून त्यानंतर मुंबईकडे कूच करणार आहे.

मोर्चा १७ दिवस ४३२ किलोमीटर पायपीट करीत मंत्रालयावर धडकणार आहे. मोर्चा नंदुरबार, साक्रीमार्गे धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा जाणार असून २३ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचेल. सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल.असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-नाशिक विभागातून ‘केटीएचएम’ची ‘लाल डबा’ सर्वोत्तम

मोर्चाला रामसिंग गावीत, करणसिंग कोकणी, किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते हे मार्गदर्शन करत आहेत. नंदुरबारहून निघालेला मोर्चा आणि साक्री, (जि.धुळे) येथून निघालेला मोर्चा ११ डिसेंबर रोजी धुळ्यात जेलरोडवर एकत्र येतील. मालेगाव येथे १३ डिसेंबर रोजी, १७ डिसेंबर रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवनाजवळ मोर्चा पोहचणार आहे. त्या ठिकाणी जाहीर सभा होईल. सभेला महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटन आणि डाव्या व आंबेडकरवादी पक्षांचे नेते मार्गदर्शन करतील.अशी माहिती दिलीप गावित, मन्साराम पवार, विक्रम गावित यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चेकर्यांच्या मागण्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, पेसा कायदा व वनहक्क कायदा यावर आक्रमण करणारा वनसंरक्षण कायदा (दुरुस्त) २०२३ त्वरित रद्द करावा, मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, बनावट आदिवासी हटवावेत आणि आदिवासी यादीतली घुसखोरी थांबवावी, केंद्र शासनाने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमालाला हमी भाव देणारा कायदा करावा, लखीमपूर-खिरीयेथे पाच शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर कारवाई करावी, शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना जाहीर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना अनुदान देऊन अन्न सुरक्षा कायद्याची (रेशन) अंमलबजावणी करावी, ऊसतोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अमंलबजावणी करावी, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा आदींचा समावेश आहे.