प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असल्याने खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये शाळा स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

गेल्या काही वर्षांत ‘सर्व शिक्षा अभियान’च्या माध्यमातून शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, यासाठी शासन तसेच शालेय स्तरावरून प्रयत्न होत आहेत. यंदादेखील या प्रयत्नांना कल्पकतेची जोड देत महापालिकेच्या शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस हटके करण्यासाठी तयारीने वेग घेतला आहे.

दोन महिन्यांच्या सुटीत शाळा परिसरात जमा झालेला कचरा, वाढलेले गवत, रंग उडालेल्या भिंती, खराब अवस्थेतील दरवाजे व तावदाने असे काही चित्र असताना केंद्र प्रमुखांची एकत्रित बैठक बोलवत शाळा स्वच्छते संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेली स्वच्छता मोहीम १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

या काळात वर्गात विद्यार्थ्यांना आवडेल, त्यांचे लक्ष वेधले जाईल अशा आकर्षक सजावटीसाठी कला शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे. भौतिक, वैज्ञानिक संकल्पना चित्र पध्दतीने मांडण्यात येतील तर शिशुवर्गासाठी अंकलिपी, अक्षरलिपी, सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत माहिती कार्टुन्स किंवा अन्य माध्यमातून रेखाटली जाणार आहेत. शाळेत येणाऱ्या बालकांचे स्वागत गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन करण्यात येईल. परिसरातून प्रभात फेरी काढत शिक्षणाचे महत्व पटवून देण्याच्या दृष्टीने पुस्तक दिंडीतून लक्ष वेधण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. सर्वच केंद्रांवर पुस्तके जमा झाली असून त्या त्या शाळेत ते वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येतील.

स्वागतासाठी छोटा भीम, डोरोमन

खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून खास कार्टून्सचा पेहराव असलेली डोरोमन, चिनचॅग, छोटा भीम, छुटकी यांच्यासह अन्य काही मंडळींना पहिल्या दिवशी निमंत्रित करण्यात आले आहे. पाटी-पुस्तकाला फाटा देत केवळ खाऊचा डबा घेऊन मुलांना पाठवा अशा सूचनाही काही शाळांनी पालकांना दिल्या आहेत. दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवसाच्या स्वागताच्या तयारीत प्रशासन असतांना पालक मात्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात गुंतले आहेत. बाजारपेठेत मुलांची आवडनिवड लक्षात घेत विविध शैक्षणिक साहित्यावर कार्टुन्सची छाप आहे. बच्चे कंपनीची मागणी लक्षात घेता खरेदीचा कल दिसून येत आहे.