लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील एमआयडीसी भागातील रसायन कंपनीत बुधवारी सकाळी स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर, दुपारी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे घरात असलेल्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीत सहा ते सात घरे भस्मसात होऊन संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. आगीत १६ बकऱ्यांचाही होरपळून मृत्यू झाला.

शहरातील एमआयडीसी परिसरात सकाळी रसायनाच्या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती. यामुळे दोन कंपन्यांमध्ये आग लागून यात प्रचंड नुकसान झाले, कंपनीतील ही आग शमत नाही, तोच जामनेर तालुक्यातील फत्तेपूरनजीक पिंपळगाव चौखंबे येथे घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. घरात दोन गॅस सिलिंडर होते. बुधवारी दुपारी १२ ते एक या वेळेत पिंपळगाव चौखंबे येथील रहिवासी किरण पाटील यांनी जनावरांसाठी तयार केलेल्या गोठ्यात आग लागली. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणत आग विझवीत असताना गोठ्यालगतच्या समाधान पाटील यांच्या घरातून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील सर्वांनाच हादरा बसला.

आणखी वाचा-खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी

गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. काही क्षणात पुन्हा शेजारी प्रवीण पाटील यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना वार्यासारखी परिसरात पसरली. घटनेची माहिती मिळताच, फत्तेपूर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी धाव घेतली. तत्काळ अग्निशामक पथकाला संपर्क साधून पाचारण करण्यात आले. आगीत बैलजोडीसह बकर्यांना आगीची झळ बसली. दोन दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच वासुदेव पाटील, समाधान पाटील, प्रवीण पाटील, रामभाऊ अवकाळे, संजय बेटोदे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यांसह अन्नधान्य, भांडीकुंडी तसेच शेतकर्यांनी शेतमाल विकून घरात ठेवलेली रोकड, कपडे जळून राख झाली. वीजतारांमध्ये घर्षण होऊन किरण पाटील यांच्या गोठ्यास आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीमुळे शेजारच्या घरांतील गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून सांगण्यात आली. आग इतकी भयंकर होती की, आजूबाजूच्या सहा ते सात घरांनाही फटका बसला आहे. याप्रकरणी फत्तेपूर येथील पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.