नाशिक : मालवाहू वाहनातून ७०० किलो गोवंश जनावराचे मांस वाहून नेण्यात येत असताना ओझर पोलिसांनी वाहन अडवून चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ओझर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना शुक्रवारी रात्री ११ वाजता मालेगांवहून मुंबईकडे मालवाहू वाहनातून गोवंश जनावरांचे मांस नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक तिवारी यांनी सहकाऱ्यांसोबत रात्री महामार्गावर एचएएल टाउनशीप गेट नंबर तीनसमोर सापळा रचला. संशयित वाहन दिसताच त्यांनी वाहन थांबविण्यास सांगितले.

चालकास गाडीत काय आहे याची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाच्या मागील बाजूची तपासणी केली असता त्यांना उग्र वास आला. वाहनाची सखोल पाहणी केली असता एका काळ्या प्लास्टिकच्या कागदाखाली निळ्या रंगाचे नऊ प्लास्टिक पिंप मिळून आले. या पिंपांमध्ये मांस आढळून आले. याबाबत चालक सय्यद मसूद आलम याच्याकडे विचारणा केली असता त्याने मालेगांव येथील अमजदकडून सदर मांस घेऊन मुंबई येथे जात असल्याचे सांगितले. ओझर पोलिसांनी सदर वाहन चालकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे. मांस आणि वाहन असा एकूण ४,६१००० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.