नाशिक : केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटत असताना या विरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात पवार हे सहभागी होत असून अशाप्रकारे आंदोलनात उतरण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत.

निर्यात बंदीच्या मुद्यावरून स्थानिक पातळीवर उमटलेले तीव्र पडसाद व विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार या निर्णयाचा फेरविचार करेल असे संकेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.

निर्यात बंदीच्या निर्णयानंतर व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद केले आहेत. अकस्मात लागू झालेल्या निर्णयाने कांदा दरात मोठी घसरण झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला माल विक्री न करता परत नेला. आधी ४० टक्के निर्यात शुल्क नंतर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य वाढवल्यामुळे मागील चार महिन्यात कांदा उत्पादकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. आता संपूर्ण निर्यात बंदीमुळे आणखी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्ही मांडल्यानंतर शरद पवार यांनी आंदोलनात स्वत: सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले. रास्ता रोकोसाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी जिथे शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार झाला होता, त्याच ठिकाणाची निवड केली आहे.

हेही वाचा >>> धावत्या वाहनातील प्राणवायू सिलिंडरच्या स्फोटाने नाशिकच्या काही भागात हादरा; इमारती, वाहनांच्या काचा फुटल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्पादक सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

केंद्र सरकारच्या कांदा आयात-निर्यात धोरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित दाद मागण्याचा निर्णय कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तसा ठराव सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक दिल्लीत जाऊन पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय वाणिज्यमंत्री यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवण्याची मागणी करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीत प्रतिक्विंटल तीन हजार रुपये पेक्षा कमी दराने लिलावात बोली लागल्यास उत्पादक हे कांद्याचा झालेला लिलाव रद्द करतील आणि कोणीही शेतकरी व्यापाऱ्यांना तीन हजार पेक्षा कमी दरात कांदा देणार नाही असे तीन महत्त्वाचे ठराव बैठकीत करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.