मालेगाव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्याच्या कटातील मुख्य संशयित वाल्मीक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे येथे शिवसेनेतर्फे (एकनाथ शिंदे) दहन करण्यात आले.
देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शिंदे गटातर्फे घेण्यात आला आहे. नऊ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. दोन दिवसांपूर्वी सीआयडीतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्राबरोबर हत्येची छायाचित्रे देण्यात आली. ही छायाचित्रे समाज माध्यमांत तसेच प्रसिध्दी माध्यमात आल्यानंतर त्यातील क्रूरता पाहून महाराष्ट्र हादरला. जनतेत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात बुधवारी सकाळी शिवसेनेच्या बैठकीत सहा मार्चला असणारा भुसे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध संस्था व संघटनांनी शहर व ग्रामीण भागात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांव्यतिरिक्त कोणतेही अन्य कार्यक्रम न घेण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची हैवान अशी संबोधना करत यात दोषी असणाऱ्या सर्वांना लवकरात लवकर फाशी दिली जावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या बैठकीनंतर संतप्त शिवसैनिकांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय दुसाने, शहरप्रमुख विनोद वाघ, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर, प्रमोद शुक्ला, सुनील देवरे, प्रमोद पाटील, दीपक सावळे आदी उपस्थित होते.