समस्या सोडविण्यासाठी ‘अ‍ॅप’ कार्यान्वित होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकीत अंतर्गत वादातून अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवू न शकलेल्या शिवसेनेत वेगवेगळ्या कारणांवरून वाद सुरूच असताना या वादावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने नाशिककरांच्या घरोघरी जाऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

२७ जुलै हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त नाशिक शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शहर व जिल्ह्य़ात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजनाची बैठक शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. अभियानांतर्गत प्रमुख पदाधिकारी प्रत्येक प्रभागात भेट देतील. नागरिकांच्या नागरी समस्या जाणून घेतील. नागरिकांशी संवाद साधून त्यावर पालिकेच्या माध्यमातून योग्य उपाययोजना करतील. प्रत्येक प्रभागातील जुन्या शिवसैनिकांना मुख्य प्रवाहात सामील केले जाईल तसेच शिवसेनेच्या जुन्या शाखांचे नूतनीकरण करून तेथे नवीन युवकांना शिवसेनेत सामील करून शाखांच्या माध्यमातून नागरी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२७ जुलैपासून नाशिककरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात येत असून त्या माध्यमातून सामान्य नागरिक त्यांच्या नागरी समस्या पाठवू शकेल. त्या सोडवण्यासाठी शिवसेना पदाधिकारी पाठपुरावा करतील. त्याची माहिती तक्रारदार मोबाइल अ‍ॅपवर पाहू शकेल, अशी माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली,

बैठकीस बोरस्ते यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आ. राजाभाऊ  वाजे, राजू लवटे, नगरसेवक प्रवीण तिदमे, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, चंद्रकांत खाडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sampark campaign will be started by nashik shiv sena
First published on: 10-07-2017 at 03:37 IST