जळगाव : शहरात विदेशातील नागरिकांना फसविण्यासाठी बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून माजी महापौराला अटक झाल्याने शिवसेनेला (एकनाथ शिंदे) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचा मोठा पदाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने वैयक्तिक शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही टेंशन वाढल्याचे बोलले जात आहे.देशांतर्गत सायबर फसवणुकीचे प्रकार अलिकडे वाढले असताना, त्यापुढे जाऊन थेट विदेशातील नागरिकांना बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून फसविण्याचे काम जळगावात सुरू होते. जळगाव ते कॅनडा व्हाया ममुराबाद फार्म हाऊस आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविल्याचा आरोप असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्या धाडसामुळे जळगावचे नाव सगळीकडे चर्चेत देखील आले आहे.

जळगावपासून दोन किलोमीटर अंतरावर कोल्हे परिवाराचा एल.के. फार्म हाऊस आहे. त्याच ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी रविवारी छापा टाकला होता. पोलिसांच्या कारवाईत ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळले.

सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेले माजी महापौर ललित कोल्हे जळगाव शहर महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच, बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ते पोलिसांच्या नजरेत आले. राजकीय वर्तुळात त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीचा घटक पक्ष भाजप काहीही करून जळगाव महापालिका ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्याकरिता ठाकरे गटासह इतर विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते कसेही असले तरी पक्षात घेण्याची रणनिती भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आखली आहे.

अशा परिस्थितीत, जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची बरोबरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाला पर्यायाने पालकमंत्री पाटील यांना माजी महापौर कोल्हे यांना अटक झाल्यानंतर मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. कारण, आपले पूर्वापार वर्चस्व असलेल्या प्रभागांमधून बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आणण्याची ताकद माजी कोल्हे यांच्याकडे आहे. त्याच ताकदीचा वापर करून शिंदे गटाला महापालिकेत आपल्या जागा वाढविण्याची संधी यंदाच्या निवडणुकीत होती. मात्र, कोल्हे नेमके निवडणुकांचे पडघम वाजल्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने आता शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे माजी महापौर कोल्हे यांच्यावर पोलीस कारवाई झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.