नाशिक – राजकीय पार्श्वभूमी लाभलेले पदाधिकारी खासगी सावकारीत उतरत सामान्यांना वेठीस धरत असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. यामध्ये आता शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) पदाधिकारी विशाल कदम याचे नवनवीन कारस्थान उघड होत आहेत. महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणात कदमला अटक झाली. व्याजाने दिलेल्या रकमेपोटी अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केल्यानंतरही कदमने मारण्याची धमकी देत संबंधितांच्या मालमत्ता नावावर केल्याचे आणखी दोन गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले आहेत.

नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मध्यंतरी मोर्चा काढला होता. सत्ताधारी पक्षांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा मुलाहिजा न बाळगता राजकीय गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आडगाव परिसरात महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकारी विशाल कदमसह चार जणांना आडगांव पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक तक्रारी करण्यास पुढे येत आहेत. संजय पाटील हे तक्रारदार त्यापैकीच एक. तक्रारदाराच्या भावाने २०१५ मध्ये विशाल कदम याच्याकडून २५ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. चार महिन्यात कदमने १० लाख रुपये वसूल केले.

 तक्रारदार व तक्रारदाराच्या भावाला मारण्याची धमकी देत त्यांच्या मालमत्ता नावावर लिहून व नोंदवून घेतल्या. यातील एक भूखंड चढ्या दराने विकून स्वत:चा फायदा करून घेतला. मूळ रक्कम व व्याज देऊनही मालमत्ता परत न करता हडप केली. त्या परत करण्याची विनंती केली असता विशाल कदम, शरद केदार आणि साथीदारांनी कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत गंगापूर शिवारातील आपल्या घरात धुडगूस घालत दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कदम आणि केदार याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी सावकारीतून व्याजाची कितीतरी पट रक्कम घेऊन सदनिका हडप केल्या प्रकरणी विशाल कदम, कय्याज शेख, कदमची आई आणि त्याचे अन्य साथीदार यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियमांसह अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुशिला मोरे यांनी तक्रार दिली. २००७ मध्ये मोरे यांनी कदमकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात वेळोवळी १५ लाख रुपये परत केले. तरी संशयिताने अधिक व्याजाची मागणी करीत व्याजाची रक्कम फेडण्यासाठी कर्ज काढण्याच्या नावाखाली सदनिका स्वत:च्या आईच्या नावावर खरेदी करून घेतली. त्यानंतरही तो अधिक पैशांची मागणी करू लागला. तेव्हा त्याने सदनिकचा जबरदस्तीने कब्जा करून धमकावल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.