नाशिक – प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. नाशिकमध्ये पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते दादा भुसे यांनी केला आहे. पक्ष म्हणजे कुटूंब. एका कुटूंबात मतप्रवाह असतात. परंतु, आम्ही एकोप्याने निर्णय घेतो. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आम्ही कामे करतो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भुसे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटात सारे काही आलबेल असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अद्याप कोणाची निवड झालेली नसली तरी जिल्ह्यातील कामे त्यामुळे अडलेली नाहीत. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि सचिव यांच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. कुठलेही काम थांबलेले नाही. लोकप्रतिनिधी आपल्या कामाच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे देत आहेत. जिल्हाधिकारी संबंधित समितीच्या सचिवांकडे त्या देतात. निकषानुसार विकास कामे मार्गी लागत आहेत, असे भुसे यांनी नमूद केले.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले. लष्करी तळासह, दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त करण्यात आले. भारतीय सैन्यदलाने शौर्य गाजवले. यासाठी ठिकठिकाणी तिरंगा यात्रा निघत आहेत. परंतु, त्याकडे काही पक्ष राजकीय भूमिकेतून बघत आहेत. याप्रश्नी कोणी उठसूठ राजकारण करू नये, असा टोला भुसे यांनी ठाकरे गटाला हाणला.