नाशिक – जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचे रात्री उशिरा मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. त्यात काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले. सहा बाजार समित्यांच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत ९६.९० टक्के मतदान झाले. मतदानानंतर घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर या समित्यांच्या मतमोजणीला सायंकाळी सुरुवात झाली होती. देवळा बाजार समितीत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यात आणि माजी सभापती योगेश आहेर यांच्या युतीमुळे सत्ता पुन्हा अबाधित राहिली आहे. शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर आपल्याच नेत्यांविरोधात लोकमान्य शेतकरी पॅनलने तीन जागा लढवत नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सर्वपक्षीय उमेदवारांना एकत्रित आणत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. केदार आहेर व योगेश आहेर यांच्या माध्यमातून १८ पैकी आठ जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले. तर काही उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने उर्वरित १० जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले. निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

हेही वाचा – झाडांना खिळे ठोकणाऱ्या २० आस्थापनांविरुध्द गुन्हे; मनपा उद्यान विभागाचे खिळेमुक्त वृक्ष अभियान

सिन्नर बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांच्या गटाला नऊ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याही गटाला नऊ जागा मिळाल्या. दोन्ही गटात प्रचंड स्पर्धा होती. फेर मतमोजणीतही निकाल कायम राहिला. दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन पॅनलने ११ तर शेतकरी उत्कर्षला केवळ पाच जागा मिळाल्या. दत्तात्रेय पाटील यांच्या प्रदीर्घ काळच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावत परिवर्तन घडले.

हेही वाचा – मालेगावात पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळवण बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील माजी सभापती धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला १५ तर माकपचे माजी आमदार जेपी गावित यांच्या पाठिंबा असलेल्या मविप्र संचालक रवींद्र देवरे यांच्या परिवर्तन पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या. इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ॲड संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला १६ तर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या.