नाशिक : तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदा या दिवसाबद्दल कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. दर्श अमावस्येला सोमवारी सुरुवात होत आहे. गुजराती भाषिक पंचांगात सोमवारी लक्ष्मी पूजनचा मुहूर्त काढला गेला. त्यामुळे लक्ष्मीपूजन नक्की सोमवारी करावे की मंगळवारी, असा प्रश्न व्यापारी, दुकानदारांसह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे याविषयी नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ तसेच इतरांनी धर्मशास्त्रानुसार कोणता दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य याविषयी मत मांडले आहे.
दीपोत्सवास उत्साहात सुरुवात झाली असून आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या लखलखाटाने परिसर प्रकाशमय झाला आहे. दिवाळीत खरेदीचा उत्साह ओसंडून वहात आहे. लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्य़ा, बत्तासे आदींनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. लक्ष्मी पूजनसाठी व्यापारी वर्ग सज्ज होत आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मी पूजनाचे महत्त्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण. तर घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. केरसुणी, पणत्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.
यंदा लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताविषयी अनेकांमध्ये संभ्रम आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पंचांगांच्या आधारे चालतो. त्या, त्या पंचांगात विशिष्ट मुहूर्त असतात. त्यामुळे काहींनी सोमवार हाच लक्ष्मीपूजनाचा दिवस मानत पूजेची तयारी केली. तर कालनिर्णय आणि दाते पंचांगानुसार लक्ष्मीपूजनचा दिवस आणि मुहूर्त मंगळवारचा आहे. यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन मुहुर्ताबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे पुरोहित मान्य करतात.
काही गुजराती भाषिक पंचागांत लक्ष्मीपूजन सोमवारच्या मुहूर्तावर करण्याचा म्हटले आहे. या पंचांगानुसार चालणारे अनेक जण सोमवारी दुपारी दीड ते दोन या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करणार असल्याचे नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी दर्श अमावस्येला सुरुवात होत असल्याने मुहुर्ताबाबत संभ्रम वाढला. काही जण सोमवारी पूजन करणार असले तरी नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाने धर्मशास्त्रानुसार दिनव्याप्ती मंगळवारी असून या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे शास्त्राला धरून असल्याचे म्हटले आहे. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी, सोमवारी दर्श अमावस्येला सुरुवात होत असली तरी दिनव्याप्ती पाहून लक्ष्मीपूजन केले जाते, असे सांगितले. दिनव्याप्ती मंगळवारी असल्याने धर्मशास्त्रानुसार या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे शास्त्राला धरून आहे. त्यानुसार मंगळवारी प्रदोष काळात, सायंकाळी सहा वाजेपासून पुढील दोन तास २४ मिनिटे म्हणजे रात्री आठ वाजून २४ वाजेपर्यंत लक्ष्मी पूजनचा मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कालनिर्णयचे आवाहन
धर्मसिंधुमधील वचनानुसार २१ ऑक्टोबर रोजी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे. अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने युग्मास महत्व देऊन प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असे वचन असल्याने २१ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी आणि प्रदोष काळात (सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास २४ मिनिटे) या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. काही वर्षांपासून समाजमाध्यमाद्वारे काही जण ऐन सणाच्या वेळेस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत गणित पद्धतीमधील फरकामुळे आणि काहींनी धर्मशास्त्रीय वचनांचा योग्य अर्थ न लावल्याने २१ ऑक्टोबरऐवजी अन्य दिवशी लक्ष्मीपूजन असण्याची शक्यता आहे. तरी अशा कुठल्याही अफवांमुळे संभ्रमित न होता परंपरेप्रमाणे, आपण ज्या पंचांगाचा, कॅलेंडरचा वापर करता, त्याप्रमाणेच लक्ष्मीपूजन करावे, असे आवाहन कालनिर्णयने केले आहे.