नाशिक – सिन्नर येथील माळेगाव आणि मुसळगाव औद्योगिक वसाहतीत चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने सुमारे दीड हजार कारखान्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयास विरोध होत असून आधी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सिन्नर इंडस्ट्रियल अँण्ड मँन्युफँक्चरर्स असोसिएशनने (सीमा) केली आहे. तर एमआयडीसीने शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असते. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. आणि सोमवारी सर्व काही सुरळीत होणार असल्याचा दावा केला आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीचा पाणी पुरवठा जलकुंभ दुरुस्तीसाठी सात नोव्हेंबरला सायंकाळी सहा ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीने उद्योजकांना दिली आहे. सलग काही दिवस पुरवठा बंद राहणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटली. माळेगावमध्ये लहान-मोठे १२०० आणि मुसळगाव वसाहतीत सुमारे ४०० उद्योग आहेत. यात हिंदुस्तान लिव्हर, स्वास्तिक पेपर, मायलन, जिंदाल आदी बड्या उद्योगांचा समावेश आहे.

एमआयडीसीने निर्णय घेताना उद्योजकांना होणारी अडचण विचारात घेतलेली नाही, असा आक्षेप सीमाचे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ आदींनी नोंदविला. पाणी बंद राहिल्याने प्रक्रिया उद्योगांचे मोठे नुकसान होईल. तर कामगारांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी उद्योजकांना धावपळ करावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची स्थिती चार दिवसांत गंभीर होईल. उद्योगांना २४ तासात लाखो लिटर पाण्याची गरज भासते. इतके पाणी ते उपलब्ध करु शकत नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसेल. ज्या उद्योगांना २४ तास पाणी लागते, त्या कारखान्यांतील उत्पादनच ठप्प होईल, याकडे लक्ष वेधले जात आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीत ४० हजार तर, मुसळगाव वसाहतीत २० ते २५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिंदालच्या कर्मचाऱ्यांची कॉलनी आहे. इतक्या मोठ्या संंख्येने असणाऱ्या कामगारांना पिण्यासह दैनंदिन गरजांसाठी पाण्याची उपलब्धता कशी करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दिवाळीच्या काळात बहुतांश कारखाने बंद होते. एमआयडीसीने जलकुंभ दुरुस्तीचे काम तेव्हाच करणे गरजेचे होते. सलग चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणे हे उद्योगांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी उद्योगांना पाणी पुरवठ्यासाठी नियोजन करावे, टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सोय करावी. पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी उपाय योजना हाती घेतल्यानंतरच पाणी पुरवठा बंद करावा. तोपर्यंत पाणी पुरवठा बंद करु नये, अशी मागणी सीमाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

माळेगाव औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठ्यासाठी टँकरची पर्यायी सुविधा देण्यात यावी. त्यानंतरच जलकुंभ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय होणार नाही. – बबन वाजे (सचिव, सीमा)

शनिवारी औद्योगिक वसाहतीत साप्ताहिक सुट्टी असते. कारखाने बंद असतात. मोठ्या उद्योगांना या निर्णयाची कल्पना देऊन पाण्याची पूर्ण क्षमतेने साठवण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी शुक्रवारी मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. सोमवारपासून तो नेहमीप्रमाणे सुरळीत होणार आहे. त्यामुळे उद्योगांना फारशा अडचणी जाणवणार नाहीत. एमआयडीसी टँकरची व्यवस्था उपलब्ध करणार नाही. दिवाळीत काही कारखाने सुरू होते. त्यामुळे त्या काळात जलकुंभाची दुरुस्ती करता आली नाही. – संदीप भोसले (उपअभियंता, एमआयडीसी, सिन्नर)