लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मागील भांडणाच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सहा जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. साक्री तालुक्यातील शिरवाडे (देश) येथे ही हत्या झाली होती.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी. साक्री तालुक्यातील शिरवाडे (देश) येथे दोन एप्रिल २०१७ च्या रात्री १० ते १०.३० या वेळेत मागील भांडणाच्या वादातून अभिमन सोनवणे, कन्हैय्या पवार, युवराज सोनवणे, बापू सोनवणे, लक्ष्मण उर्फ लखा सोनवणे, राज सोनवणे यांनी काकाजी माळी आणि हिरामण ग देसले यांच्यावर लाठ्याकाठ्यांसह सळईने हल्ला केला होता. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात हिरामण देसले यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काकाजी माळी यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक सुनील भाबड यांनी केला. न्यायालयाल दोषारोपत्र दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोप निश्चितीनंतर खटल्याची सुनावणी धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्यासमोर झाली. सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील तंवर यांनी तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काकाजी माळी, प्रत्यक्षदर्शी बापू देसले, दुखापती झालेला प्रत्यक्ष साक्षीदार हिम्मत देसले, शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश गढरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिला अहमद, पंच एकनाथ ठाकरे, हवालदार धनंजय मोरे, तपासी अधिकारी सुनील भाबड अशा नऊ जणांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. न्या. जयश्री पुलाटे यांनी उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्व सहा आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी १० हजाराचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली.