नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. विभागात ४८६ केंद्रात दोन लाख दोन हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ३० हून अधिक भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील दोन हजार ८२८ शाळांमध्ये ही परीक्षा होणार आहे. विभागातून दोन लाख दोन हजार ६२७ परीक्षार्थी आहेत. १७ नवीन केंद्र सुरू झाले असून एकूण ४८६ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ५९ परीक्षक असून ३० भरारी पथके परीक्षेवर लक्ष ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेविषयी असणारी भीती पाहता राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विभागीय मंडळाच्या २५३-२९५०४१० या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांवर येणारा ताण पाहता स्वतंत्र मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे. मदतीसाठी नाशिक जिल्ह्याकरिता किरण बावा (९४२३१८४१४१), धुळ्यासाठी नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१), जळगावसाठी दयानंद महाजन (७७६८०८२१०५) आणि नंदुरबारसाठी राजेंद्र माळी (९४०४७४९८००) यांच्याशी संपर्क साधावा.दरम्यान, परीक्षा केंद्र कुठे आहे, याची पाहणी परीक्षेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी व पालकांनी केली.

समुपदेशकांचा सल्ला

मुलांसाठी दहावीची परीक्षा नवीन आहे.. पालक तसेच अन्य लोकांकडून दहावीच्या परीक्षेविषयी सतत सांगितले जात असल्याने त्यांच्या मनावर दडपण आले आहे. परीक्षा अवघड आहे. वेळेत प्रश्नपत्रिका सोडवता येईल की नाही, पाठांतर केलेले आठवेल का, असे अनेक प्रश्न समुपदेशकांना विचारले जात आहेत. आपण अभ्यास केला आहे, यावर विश्वास ठेवा. वेळेचे नियोजन करा, असा सल्ला समुपदेशकांकडून दिला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिली ते नववीची तोंडी परीक्षा

पहिली ते नववीच्या वर्गासाठी परीक्षा सुरू होणार आहेत. वार्षिक लेखी परीक्षेस अवधी असला तरी बहुतांश शाळांमध्ये मौखिक परीक्षेस आरंभ झाला आहे. इयत्ता दहावी परीक्षेमुळे मिळणाऱ्या मोजक्या काही वेळात भरणारी शाळा पाहता शिक्षकांकडून उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे, वह्या तपासणी आदी कामांचे नियोजन करण्यात येत आहे.