नाशिक – इयत्ता दहावी निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेस ऑनलाईन पध्दतीने बुधवारी सुरूवात झाली. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. दहावीचा निकाल १३ मे रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. लवकरच त्यांना गुणपत्रक मिळणार आहे. या कालावधीत शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिला भाग भरून घेण्यात येत आहे.
बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात येतील. अर्जात विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती भरून घेण्यात येत आहे. बुधवारी संकेतस्थळ ठप्प होण्यासह इतर तांत्रिक अडचणींना विद्यार्थी आणि पालकांना तोंड द्यावे लागले. अर्ज भरतांना पहिल्याच दिवशी शाळा सोडल्याचा दाखला मागण्यात आल्याने समस्या निर्माण झाली. निकाल विद्यार्थ्यांच्या हातात मिळेपर्यंत शाळेचा दाखला दिला जात नाही. इतर तांत्रिक अडचणींमुळेही बहुसंख्य विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या यु डायस क्रमांकावरूनच प्रवेशाचा पहिला भाग भरून घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.