नाशिक – महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुर्नरचनेनुसार नाशिक परिमंडलात कामास सुरूवात झाली. ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये सुसूत्रता येईल. शिवाय ग्राहकांना तत्परतेने सेवा मिळणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर प्रामुख्याने भर देण्यात आला. शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली. ग्राहक संख्येनुसार अभियंता, कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली. महावितरणच्या विभाग कार्यालयांत बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे.

प्रत्येक विभागात सध्या अस्तित्त्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल. म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग असतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीज यंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीज यंत्रणा उभारणी, वीज पुरवठा तक्रारींचे निवारण आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, देयके, देयक तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुलीची कामे करणार आहेत.

या पुनर्रचनेमुळे महसूल व देयकांच्या ग्राहक सेवेसाठी तसेच सुरळीत वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र उपविभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाचवेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत कामे करता येईल. पूर्वीप्रमाणेच महावितरणची कक्ष कार्यालये सुरू असून ग्राहकांना कुठलीही अडचण वा तक्रार असल्यास या कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांकडून माहिती व मदत मिळणार आहे. वीज पुरवठ्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी १९१२, १८०० २१२३४३५, १८०० २३३ ३४३५ या टोल फ्री क्रमांकांसह महावितरणच्या ॲपवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.