लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांचा वावर त्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. सिन्नरजवळील मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सिन्नर तालुक्यातील गणेशखिंड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.




जिल्ह्यात बिबट्या दिसणे आता नेहमीचे झाले आहे. पशुधनावर तसेच कधीकधी माणसांवरही बिबट्याचे हल्ले होत आहेत. सर्वत्र मुक्त संचार आता बिबट्यांसाठीही धोकादायक ठरु लागला आहे. गुरूवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील कासारवाडी (गणेशखिंड) येथील भागवत साळुंखे यांच्या विहिरीत एक ते दीड वर्षाची बिबट्या मादी पडलेली आढळून आली. पश्चिम भागाचे उपवन संरक्षक पंकज कुमार गर्ग, सहायक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. सरपंच, पोलीस पाटील आणि कासारवाडीचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बिबट्या मादीला सुरक्षितपणे बाहेर काढून नांदुर शिंगोटे वन वसाहत येथे नेण्यात आले.
आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त, अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरनजीक असलेल्या मोहदरी घाटाच्या परिसरात जंगल आहे. या घाटात भक्ष्याच्या शोधात फिरत असलेला बिबट्या महामार्गावर आल्यावर बुधवारी रात्री वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रक्रियेवेळी काही काळ वाहतूक खोळंबली होती. बिबट्या अंदाजे साडेतीन वर्षाचा होता.