नाशिक : शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त विधानांनी वारंवार अडचणीत सापडणारे राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे विधिमंडळ सभागृहात कथित ऑनलाईन रमी खेळताना आढळले. आणि यासह आपल्या जुन्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना पुन्हा नव्या चक्रव्युहात अडकले. कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना आता एकतर नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुकाणू समिती निर्णय घेईल, असे म्हटले आहे.
रोखठोक, परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध कृषिमंत्री माणिक कोकाटे हे भ्रमणध्वनीवर कथित रमी खेळत असलेल्या चित्रफितीमुळे विरोधकांसह शेतकरी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढविला आहे. मात्र, अलीकडेपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंची एकप्रकारे पाठराखण केली. कथित रमी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी असल्यास नागपूर अधिवेशनात आपण राजीनामा देऊ, असे खुद्द कोकाटेंनी सूचित केल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्याबाबत टोकाचा निर्णय घेणे टाळल्याचे मानले गेले.
सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंना याआधीही उपमुख्यमंत्री पवारांनी यांनी तंबी दिली होती. तेव्हापासून सावध पवित्रा घेणारे कोकाटे हे कथित रमीत अडकले. त्यांच्या नित्यनव्या कृत्याने पक्षासह उपमुख्यमंत्री पवार यांच्याही अडचणी वाढत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्याविषयी आधीच नाराजी प्रगट केली आहे.
आपल्याच जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेते, आम्ही एक रुपया देत नाही. त्यामुळे भिकारी कोण तर, शासन आहे, शेतकरी नाही, असे विधान करुन पुन्हा नवा वाद ओढवून घेतला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.
एका मंत्र्यांना अशा पद्धतीने बोलणे शोभत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनाक्रमाने कोकाटे हे आता मंत्रिपदी राहतील की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. तंबी देऊनही त्यांच्या कार्यशैलीत बदल झाले नसल्याची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. कोकाटेंचे नेमके काय करायचे, याबद्दल पक्षाच्या वर्तुळात खलबते सुरू आहेत. परखड बोलणाऱ्या कोकाटेंकडून कृषिखाते काढून त्यांना अन्य खात्याची जबाबदारी सोपवावी, असा एक मतप्रवाह आहे.
तर पक्षातील काही वरिष्ठ नेते त्यांना मंत्रिपदावरून डच्चू देण्याची मागणी करीत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण दिल्लीत असल्याचे नमूद केले. पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुकाणू समिती अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सूचित केले.