नाशिक : राजीवनगरात पुढे तपासणी सुरू असल्याची बतावणी करत संशयितांनी दोन वृद्धांना गंडा घातला. तपासणीच्या बहाण्याने संशयितांनी एकाची रोकड तर, दुसऱ्याची सोनसाखळी हातचलाखीने लंपास केली.
याबाबत राजीवनगर येथील नारायण वाळवेकर (८८, राजीव टाऊनशिप) यांनी तक्रार दिली. वाळवेकर हे मंगळवारी दुपारी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे निवृत्ती वेतन काढण्यासाठी गेले होते. निवृत्ती वेतनाची रक्कम घेऊन ते घराकडे जात असताना बँकेपासून काही अंतरावर दोघा संशयितांनी त्यांना रोखले. पुढे तपासणी सुरू असून हातातील रक्कम सुरक्षित ठेवा, असा सल्ला देत संशयितांनी मदतीच्या बहाण्याने त्यांचे १५ हजार रुपये हातोहात लांबवले. याच भागात योगेन मामतोरा (६८) यांनाही गंडा घालण्यात आला. मदतीचा बहाणा करीत संशयितांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकत्रित फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन घरफोड्यांमध्ये चार लाखाचा ऐवज चोरीस
शहरात वेगवेगळ्या भागात दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरफोडीची पहिली घटना ध्रुवनगरमधील महाले रो हाऊस येथे घडली. याबाबत शादाब शेख (धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर) यांनी तक्रार दिली. शेख कुटूंबिय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ५५ हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना जेलरोड भागात घडली. याबाबत नवनीत चौबे (मनियारी व्हिला, मंगलमूर्ती नगर) यांनी तक्रार दिली. चौबे कुटुंबिय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीच्या सळई तोडून अडीच लाखाची रोकड, सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नफ्याच्या आमिषाने फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवत संशयितांनी शहरातील एका व्यक्तीला तब्बल सव्वा सतरा लाख रुपयांना गंडा घातला. पाच महिने उलटूनही गुंतवणूकीची रक्कम आणि मोबदला न मिळाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसात धाव घेतली. मागील महिन्यात शहरातील गुंतवणुकदाराशी संशयिताने संपर्क साधला होता.
एका वेल्थ कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कंगना शर्मा, आशिष केहेर आणि त्यांच्या साथीदारांनी वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधत शेअर बाजारतील व्यवहारातून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले. संशयितांनी विश्वास संपादन करीत गुंतवणूकदारावा वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडले. या घटनेत गुंतवणूकदाराची १७ लाख १८ हजार ६३७ रुपयांना फसवणूक झाली.
पाच महिने उलटूनही गुंतवणूकीची रक्कम व मोबदला पदरात न पडल्याने संबधिताने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालमोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
मेरी लिंक रोड भागात भरधाव मालमोटारीने दिलेल्या धडकेने २७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हितेश पाटील (लक्ष्मी रो हाऊस, गायत्रीनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाटील रात्री आरटीओकडून मेरी लिंकरोडने दुचाकीवर घराकडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मालमोटारीने दुचाकीला धडक दिली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने नातेवाईक नितीन पाटील यांनी त्यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. डॉ. धवल साळवी यांनी दिलेल्या माहितीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.