ग्रामसेवक किशोर विभुते यांचा निश्चय यशस्वी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिन्नर तालुक्यातील हिवरे गाव हागणदारीमुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अशा वेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय केला. बाहेरच्या जिल्ह्यातील तरुण आपल्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचाही त्याग करीत असल्याचे पाहून ग्रामस्थ पुढे सरसावले आणि अवघ्या काही महिन्यांतच गाव हागणदारीमुक्त झाले.

सिन्नरपासून साधारणत: १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरे गावात एकूण ३५१ कुटुंबे आहेत. त्यांपैकी १७४ कुटुंबांकडे शौचालय होते. उर्वरित १७७ कुटुंबे शौचालय बांधण्यासाठी पुढे येत नव्हती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सिन्नर पंचायत समिती येथे घेतलेल्या बैठकीत शौचालय उभारणीसाठी ग्रामस्थांना तयार करण्याचे आव्हान कोण स्वीकारेल, असा सहज प्रश्न उपस्थित केला असता विभुते यांनी कोणताही विचार न करता ते स्वीकारले. एवढेच नव्हे तर गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय बोलून दाखविला. काहींनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले.

दरम्यान जून २०१६ मध्ये विभुते यांचा साखरपुडा झाला. तत्पूर्वी गावात २०१४-१५ मध्ये १४ आणि २०१५-१६ मध्ये १०७ कुटुंबांनी शौचालय बांधले होते. या कुटुंबांना १२ हजार याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. उर्वरित ५६ कुटुंबांकडे शौचालय नसल्याने त्यांनी विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यास नकार दिला. गावात त्यांच्या विवाहाची आणि त्यासाठी शौचालय बांधण्याची चर्चा होऊ लागली. अखेर ऑगस्ट  २०१६ मध्ये राहिलेल्या सर्व शौचालयांचे काम पूर्ण होऊन गाव हागणदारीमुक्त जाहीर झाले. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने विभुते यांनी विवाह निश्चित केला. २१ एप्रिल रोजी त्यांचा विवाह उदगीर तालुक्यातील संगम येथे होत आहे. गाव हागणदारीमुक्त होण्याच्या आनंदाइतकाच आनंद ग्रामस्थांना विभुते यांच्या विवाह सोहळ्याचा आहे.

आज संपूर्ण गाव त्यांना शुभेच्छा देत आहे. आपण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय विवाह न करण्याचा निश्चय केल्यावर ग्रामस्थांनी शौचालय बांधण्यास सहमती दर्शविली. सर्वाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे विभुते यांनी सांगितले.

ग्रामस्थांचा पुढाकार

विभुते हे मूळचे लातूर जिल्ह्यातील नळेगावचे. धडाडीचे ग्रामसेवक म्हणून आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली. हीच धडाडी दाखवीत त्यांनी ग्रामस्थांना तत्कालीन सरपंच लता सहाणे, विद्यमान सरपंच विमल बिन्नर यांच्यासह घरोघरी जाऊन समजविण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. विविध बैठकांतून मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे आणि ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनीदेखील बैठकांमधून विभुते यांचे उदाहरण देत ग्रामस्थांनी गावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विभुते यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या मानसिकतेत हळूहळू परिवर्तन झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swachh bharat abhiyan in nashik
First published on: 21-04-2017 at 01:28 IST