लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात फळ विक्रेता सलमान शेख याचा रविवारी बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सलमान हा मित्रांसोबत रविवारी सुटीच्या दिवशी सायंकाळी क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याची खोली अधिक असलेल्या भागात सलमान पोहत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी क्रीडा संकुलात धाव घेत चौकशी केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा… प्रतिकात्मक आंदोलनाने शिवसेनेचे प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी मक्तेदाराकडून दोन जीवनरक्षकांसह प्रत्येकी एक सुरक्षारक्षक व प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची असून ते लवकरच बसविण्यात येणार आहेत. मक्तेदाराशी केलेल्या करारानुसार पोहण्यासाठी एका दिवसाचा परवाना दिला जातो. मागणी केल्यास सुरक्षासाधने दिली जातात. तलाव स्वच्छतेसाठी क्रीडाधिकारी नियुक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.