जळगाव : अनियमित पावसासह अस्थिर बाजारभाव, मजुरीचे वाढते दर आणि उत्पादनातील घट, या काही कारणांमुळे कापसाची शेती अलिकडील काही वर्षात सातत्याने तोट्यात जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे मका, सोयाबीन आणि तूर पिकांवर भर दिल्याने राज्यभरात कपाशी लागवडीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता कपाशीचे क्षेत्र १० ते १२ टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ४२ लाख ४७ हजार २१२ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात, २०२३-२४ मध्ये ४२.२२ लाख हेक्टर, २०२४-२५ मध्ये ४०.८६ लाख हेक्टरवर कपाशी लागवड झाली होती. दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरिपात १० जुलैअखेर फक्त ३५ लाख ४६ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी लागवड झाली आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिल्यावर राज्यात सर्वसाधारण क्षेत्राशी तुलना करता तब्बल १६ टक्क्यांनी कपाशी लागवड कमी झाली आहे. चांगल्या उत्पादनासाठी योग्य मानली जाणारी लागवडीची वेळ टळून गेल्याने यापुढील काळातही कपाशी लागवडीत फार वाढ होण्याची शक्यता नाही.
प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन लक्षणीय घटलेले असताना संबंधित सर्व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या मानाने अपेक्षित भाव अलिकडील काही वर्षात मिळू शकलेला नाही. खरेदीतील अनियमितता आणि ओलाव्यासाठीच्या जाचक अटींमुळे शासकीय खरेदी केंद्रांचा काही एक उपयोग होत नसताना शेतकऱ्यांसमोर खासगी व्यापाऱ्यांशिवाय दुसरा पर्याय नसतो. अर्थात, व्यापारी मोजमापात घोळ करून व हमीभावापेक्षा खूपच कमी भाव देऊन शेतकऱ्यांची सर्रास लूट करतात.
परिणामी, बीटी बियाण्यासह खते, किटकनाशके आणि वेचणीच्या मजुरीचा हिशेब केल्यावर कापसाची शेती हंगामाच्या शेवटी अक्षरशः आतबट्ट्याची ठरते. कापूस घरात आल्यावर डोक्यावरील कर्जाचा भार कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढतो. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीसाठी म्हणावा तसा उत्साह दिसून आलेला नाही. लागवड घटल्याचा मोठा परिणाम कापसाच्या उत्पादनावर पुढील काळात होण्याची शक्यताही बळावली आहे.
मका क्षेत्रात ३१ टक्क्यांची वाढ
राज्यातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवड कमी केल्यानंतर कमी कालावधीत व कमी खर्चात चांगले उत्पादन देणाऱ्या मका पिकावर बऱ्यापैकी लक्ष्य केंद्रीत केले आहे. राज्यातील मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ लाख ३३ हजार ८१९ हेक्टर असताना, त्या तुलनेत यंदाच्या खरिपात १० जुलैअखेर सुमारे १२ लाख २६ हजार ७२० हेक्टर (१३१ टक्के) क्षेत्रावर मका लागवड पूर्ण झाली आहे.
विविध कारणांनी कापसाची शेतीत परवडेनाशी झाल्याने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आणि तुरीसारख्या पिकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी, कपाशी लागवडीखालील क्षेत्र १० ते १२ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. – कुर्बान तडवी (जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव)