लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी सत्रनिहाय परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहेत. सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबरअखेर उपलब्ध होईल. कृषी पदविका शिक्षणक्रमाचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, अशी माहिती मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.

विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी सत्रनिहाय परीक्षेसाठी १५ अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थींनी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. विनाविलंब शुल्क परीक्षा अर्ज करण्याची मुदत २५ सप्टेंबर पर्यंत आहे. २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शंभर रुपये विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. पाचशे रुपये विशेष विलंब शुल्कासह एक ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क हे ऑनलाइन भरावयाचे आहे.

हेही वाचा… उड्डाण पुलावरून कोसळणाऱ्या जलधारा थांबवा, देवयानी फरांदे यांची महामार्ग दुरुस्तीची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधीची वैधता व पुनर्नोंदणी इत्यादी बाबींच्या सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाचे ३१ ऑगस्ट सूचनापत्र विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेत स्थळावर माहिती घ्यावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव भटुप्रसाद पाटील यांनी केले आहे.