नाशिक -शहरात २४ तासात सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या तीन घटना घडल्या. त्यात म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील दोन घटनांचा समावेश असून, याप्रकरणी म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्पना माळोदे (रा. ओमकारनगर, मखमलाबाद- म्हसरूळ लिंकरोड) या बुधवारी सायंकाळी परिसरातील मंडईत भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. ओमकारनगर येथील विठ्ठल मंदिरासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून ओमकारनगरच्या दिशेने पोबारा केला. याच काळात दुसरी घटना पेठरोडवर घडली. सुनंदा काळे (रा.यशोदानगर,पेठरोड) बुधवारी सायंकाळी एसटी कार्यशाळेसमोरून रस्त्याने पायी जात असतांना राजमान्य सोसायटीसमोर दुचाकीस्वारांनी त्यांचे सुमारे ५२ हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना चेतनानगर भागात घडली. सविता बुकाणे (रा.हॉटेल साई पॅलेस पाठीमागे) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे परिसरात कापड दुकान असून मंगळवारी रात्री त्या दुकान वाढवून घराकडे पायी जात असतांना साई पॅलेस हॉटेल पाठीमागील एकविरा किराणा दुकानासमोर दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी सुमारे ४० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सोन साखळी चोरी
२०२३ – १२६
२०२४ – १०६
२०२५ – पहिल्या पाच महिन्यात १५