लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे: शहरातील राजेंद्र सुरी नगरातील श्री पार्श्व भैरव धाम मंदिरातील सुरक्षा रक्षकाला कोंडून चोरट्याने चांदीचा मुकूट, सोन्याच्या कपाळपट्ट्या यासह रोकड, असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मंदिरातून चोरी करुन जातानाचे चोरट्याचे चित्रण परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.

श्री पार्श्व भैरव धाम हे दुमजली मंदिर आहे. या मंदिराचा सुरक्षारक्षक किशोर वराडे (रा.अलंकार सोसायटी) मंदिराजवळच्या खोलीत झोपलेला असताना चोरट्याने त्याच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर मंदिराचे कुलूप तोडून तळ मजल्यावरील भगवान नाकोडा यांच्या मूर्तीवरील दोन ते अडीच किलो वजनाचा चांदीचा मुकूट, २५ ग्रॅम वजनाची सोन्याची कपाळपट्टी, दान पेटीतील २० ते २५ हजार रुपये, याशिवाय वरील मजल्यावर असलेल्या संकेश्वर पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीवरील चांदीचा दोन ते अडीच किलो वजनाचा मुकूट, २५ ग्रॅम वजनाची सोन्याची कपाळपट्टी, दानपेटीतील सुमारे २० हजार रुपये आणि राजेंद्र सुरी गुरु मंदिरातील दानपेटीतून २० ते २५ हजार रुपये तसेच चांदीचे नारळ असा एकूण सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

हेही वाचा… जळगाव: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; १९ गुन्ह्यांची कबुली

शुक्रवारी सकाळी मंदिराचे पुजारी जितू जोशी आले असता ही चोरी उघड झाली. यानंतर त्यांनी मंदिराचे अध्यक्ष विजय राठोड यांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली.

शहर उपविभागाचे उपअधीक्षक एस.ॠषीकेश रेड्डी यांनी सुरुवातीला अवैध धंद्यावर आळा घातला. कथीत गुंडांना धडकी भरविली. परंतु, दुसरीकडे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरदिवशी घरफोडी, चोरी, खून, मंदिरातील मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. रेड्डींनी अवैध धंद्यांवर कारवाई करताना रहिवाशांच्या घरांसह मंदिरांच्या सुरक्षेच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नांमध्येही लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief stole 7 lakh rupees things from temple after locking the security guard dvr
First published on: 27-05-2023 at 18:55 IST