नाशिक : अमली पदार्थाच्या विळख्यातून युवापिढीसह नाशिककरांना मुक्त करण्यासाठी नाशिक पोलीस सक्रिय झाले आहेत. अमली पदार्थ विरोधी अभियान शहरातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या कारवाईच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये छापा टाकत साडेचार लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.

शहर परिसरात गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय असून स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यासंदर्भात निवेदन दिले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेत गुन्हेगारीत विधीसंघर्षित बालकांच्या वाढत्या सहभागाविषयी चिंता व्यक्त केली. पोलिसांकडून तपासणी मोहीम किंवा अन्य कारवाईमधून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणत असल्याचा दावा केला जात असतांना दुसरीकडे अमली पदार्थाचा वापर वाढत आहे.

पोलिसांनी याविषयी माेहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने द्वारका परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकत मुज्जफर शेख (रा. कथडा), फरहान शेख (रा. बागवानपुरा), अनिल वर्मा (रा. तपोवन रोड) आणि हिना कापसे (रा. निलगिरी बाग) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ३० ग्रॅम मेफेड्रोन पावडर आढळली. पोलिसांनी या कारवाईत वाहन आणि तिघांचे भ्रमणध्वनी असा अंदाजे साडेसतरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार विभाग एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या पथकाने केली.

लीस आयुक्त हद्दीतील परिमंडळ दोन अंतर्गत सातपूर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत सहा गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केलेल्या सुचनेनुसार निखील पवार (२५, रा. पवार मळा) याच्यावर दरोडा घालणे, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. कृष्णा चव्हाण (२२, रा. म्हाडा वसाहत) विरूध्द साथीदारांसह जबरी चोरी करणे, समाजमाध्यमात धमकी देणे, गंभीर दुखापत करणे, सार्वजनिक शांतता बिघडविणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदित्य हंश (१९, रा. जयभवानी रोड) विरूध्दही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पियुष दोंदे (२०, रा. शास्त्रीनगर) विरूध्द साथीदारांसह धारदार हत्याराने गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगणे, आदी गुन्हे दाखल आहेत. विकास परदेशी (२५, रा. गाडेकर मळा) विरूध्द साथीदारांसह धारदार हत्याराने गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा आहे. नाशिकरोड परिसरात रहेमान जाफर शेख (२८, रा. देवळाली गाव) विरूध्द दहशत निर्माण करणे, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात धमकावणे, दुखापत करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर निखील पवार, कृष्णा चव्हाण, आदित्य हंश, पियुष दोंदे, विकास परदेशी, रहेमान शेख यांना दोन वर्षासाठी नाशिक जिल्हा तसेच शहर परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.