जळगाव – शहरात जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्थेसह यावल वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीची सुरूवात करण्यात आली. उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दोन दिवसांच्या रॅलीमध्ये महाराष्ट्रासह गुजरातमधून आलेले १०० व्याघ्रदूत आणि जळगावमधील विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे यावल वन विभागाकडून रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना दोन्ही दिवस जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नशिराबादसह भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल येथे रॅली पोहोचल्यानंतर  मंगळवारी जनजागृतीचा कार्यक्रम होईल. दरम्यान, रॅली दरम्यान पहिल्या दिवशी वाघ वाचवा-जंगल वाचवा, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजविलेल्या सफारी वाहनावर उभे केलेले दोन मानवी वाघ रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. नागरिकांनी मानवी वाघांसोबत भ्रमणध्वनीमध्ये सेल्फी काढून रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. या रॅलीत वाशीम, ठाणे जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पाल येथे विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी टी-शर्ट वाटप, दुर्गम भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आणि वनमजुरांना चटई वाटप, वृक्षारोपण व बीजारोपण यासारखे काही कार्यक्रम उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या उपस्थिती पार पडणार आहेत, अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांनी दिली. या उपक्रमाच्या आयोजनासाठी यावल वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, सतीश कांबळे, मुकेश सोनार यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि वन्यजीवप्रेमी कार्यरत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाघांचे जैव विविधतेतील महत्त्व अधोरेखित करून जंगलांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही रॅली नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रूजवून त्यांना सक्रिय सहभागासाठी प्रेरित करेल, अशी आशा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगावमध्ये रॅलीला हिरवा झेंडा दाखविताना व्यक्त केली.