जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक करणाऱ्या सोने, चांदीच्या दरात धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी मोठी घसरण झाली. ग्राहकांसह व्यावसायिकांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला.

शहरात शुक्रवारी ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने एक लाख ३५ हजार १३६ रूपयांचा नवीन उच्चांक केला होता. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी सोने आणखी किती वधारते, याकडे ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. मात्र, शनिवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २७८१ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ३५५ रूपयांपर्यंत घसरले.

धनत्रयोदशी- दिवाळीला सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यानुसार, यंदा १० ते २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांना आणि १० ते १०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहण्याची चिन्हे होती. परंतु, उच्चांकी दरवाढ लक्षात घेता यंदा नाण्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता देखील तितकीच होती. प्रत्यक्षात ऐनवेळी सोने, चांदीच्या दरात घट झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहरात १५ ऑक्टोबरला चांदीने जीएसटीसह सुमारे एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला होता. त्यानंतर १० हजारांपेक्षा अधिक घट नोंदवली गेल्याने चांदीचा तोरा उतरला आणि एक लाख ८० हजार २५० रूपयांपर्यंत चांदीचे दर कमी झाले. आणखी दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, शुक्रवारी दिवसभरात पुन्हा १०३० वाढ नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ८१ हजार २८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत अचानक ११ हजार ३३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत घसरली. दरम्यान, शनिवारी सकाळी पुन्हा ५१५० रूपयांची सुधारणा झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७५ हजार १०० रूपयांवर स्थिरावले.

धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसांत सोन्यापेक्षा जास्त नाव कमावले होते. त्यामुळे चांदीपेक्षा आपले सोनेच बरे, असे म्हणण्याची वेळी ग्राहकांवर आली होती. मात्र, धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सकाळी चांदीत अचानक घसरण झाली. जगभरात निर्माण होणाऱ्या एकूण चांदीच्या मागणीपैकी जवळपास अर्धी मागणी ही औद्योगिक वापरासाठी असते. त्यामुळे चांदीचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व सातत्याने वाढत आहे. मात्र, या वाढत्या मागणीच्या तुलनेत चांदीचे उत्पादन तितके वाढलेले नाही. परिणामी, बाजारात चांदी गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरत असल्याचे जाणकारांनी सांगितले.