जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत नवरात्री सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी दरवाढ होताना दिसून आली आहे. दोन्ही धातुंच्या दरात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी नेमकी किती वाढ होते, त्याकडे ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले होते.
आजच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत थोडीफार घसरण झाली. यामागे उच्च पातळीवर झालेली नफा वसुली, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि मंदावलेली मागणी असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सकाळपासूनच दबाव दिसून आला. गेल्या काही सत्रांमध्ये सोन्यात सातत्याने वाढ झाल्याने अनेक गुंतवणूकदारांनी उच्च दरावर नफा वसूल केला. या विक्री दबावामुळे देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याची किंमत घसरली. दरम्यान, अमेरिकन डॉलर निर्देशांकात ०.१०% वाढ झाल्याचे दिसून आले. डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनांमध्ये सोने अधिक महाग झाले आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये भौतिक स्वरूपातील सोन्याची मागणी कमी झाली आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतींवर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतासारख्या मोठ्या ग्राहक असलेल्या देशातही सोन्याची मागणी मंदावल्याचे संकेत मिळत आहेत. उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असूनही, ग्राहक खरेदीत फार रूची दाखविताना दिसून आलेले नाहीत. उच्च किमतीमुळे अनेक ग्राहक दर कमी होण्याची प्रतीक्षा करत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकार सांगतात. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांच्या नजरा आता अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीकडे लागल्या आहेत. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाविषयी संकेत मिळाल्यास सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठे चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सध्या नफा वसुली, डॉलरची मजबुती आणि मागणीत झालेली घट, यामुळे सोन्याच्या बाजारात दबाव कायम असल्याचे चित्र आहे.
जळगावमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १५ हजार ९७८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा २१६३ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याच्या दराने एक लाख १८ हजार १४१ रुपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. सुवर्ण बाजारपेठेत एक सप्टेंबरला सोन्याचे दर एक लाख आठ हजार ४५९ रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्याच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत ९५०० रुपयांहून अधिक वाढ झाली. मात्र, बुधवारी सकाळी बाजार उघडताच २०६ रूपयांची किरकोळ घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १७ हजार ९३५ रूपयांपर्यंत खाली आले.
चांदीचे दरही स्थिर
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३८ हजार २० रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मंगळवारी दिवसभरात पुन्हा २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीच्या दराने एक लाख ४० हजार ८० रूपयांचा नवा उच्चांक केला. एक सप्टेंबरला एक लाख २८ हजार रूपयांपर्यंत असलेल्या चांदीच्या दरात तीन आठवड्यात १२ हजार रूपयांहून अधिक वाढ झाली. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर चांदीत कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही.