नाशिक – शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असताना आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. काही महिन्यांपासून शहरातील वाढती गुन्हेगारी हा विषय चर्चेत राहिला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४२ हत्यांची नोंद झाली आहे. शहरातील तरुणाईला अमली पदार्थाचा विळखा बसत आहे.
अवघ्या दीड वर्षांवर शहरात कुंभमेळा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर नाशिकची गुंडनगरी अशी तयार होणारी प्रतिमा बदलण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उध्दव ठाकरे), मनसे या राजकीय पक्षांनी गुन्हेगारीविरुध्द आवाज उठविणे सुरु केले आहे. चहुबाजूकडून होत असलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कर्णिक यांनी शहरातील पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची गंगापूर ठाण्यात, गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड, तसेच अंबडचे दुय्यम निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांची सातपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांची आडगाव, मुंबई नाकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे यांची एमआयडीसी चुंचाळे, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांची विशेष शाखा, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक संजय भिसे यांची सायबर, एमआयडीसी चुंचाळेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांची मुंबई नाका, इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा एक , शहर वाहतूक शाखा एकचे वरिष्ठ निरीक्षक तुषार आढाव यांची सातपूर, शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट येथे बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा, असा आदेश आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे.