नाशिक – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाप्रमाणेच श्री क्षेत्र गाणगापूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने भव्य दत्तपीठ उभारण्यात आले आहे. श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथातील ४८ व्या अध्यायामध्ये पर्वतेश्वर नामक शेतकऱ्याच्या शेतावर श्री दत्त महाराज कृपादृष्टी टाकतात, अशी पौराणिक कथा आहे. त्याच जागेवर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने दत्तपीठाची निर्मिती झाली आहे. अशा या दत्तपीठामध्ये २४ ते २६ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम कोणते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे समाजकार्य केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर, देशभरात पसरले आहे. लाखो सेवेकरी यानिमित्ताने समाजकार्याशी जोडले गेले आहेत. श्री क्षेत्र गाणगापूर येथे २४ ऑक्टोबर रोजी भीमा-अमरजा संगमावर नदी पूजनाचा कार्यक्रम होईल. त्याच दिवशी सायंकाळी दत्तपीठावर लक्ष दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा दीपोत्सव साजरा करण्यात येईल. भक्ती ,श्रद्धा आणि प्रकाशाच्या तेजाने भारावलेल्या चैतन्यदायी वातावरणात वेदमंत्रांच्या जयघोषात हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याचे भाग्य सेवेकऱ्यांना लाभणार आहे. त्यानंतर सेवामार्गाचा मासिक महासत्संग २५ ऑक्टोबर रोजी गाणगापूर दत्तपीठावर होईल. त्यानिमित्ताने भूपाळी आरती नंतर लगेचच श्री दत्तात्रय वज्रकवच पठणाची सामूहिक सेवा घेण्यात येणार आहे. या सेवेनंतर श्री सत्यनारायणाची महापूजा होईल. सकाळी १०:३० च्या आरतीनंतर सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हितगुजाचा सेवेकरी लाभ घेतील. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
ऑक्टोबरच्या मासिक महासत्संगानिमित्त गाणगापूर दत्तपीठावर श्रीघोर कष्टोद्धारक पादुका पूजनाचा सोहळा २४ ते २६ ऑक्टोबर असा सलग तीन दिवस घेण्यात येणार आहे. या सेवेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या गुरुपादुका पूजनात सेवेकरी, भाविक, भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती मासिक महासत्संगात राहणार आहे.
नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपुलकीची दिवाळी अभियानांतर्गत अनाथाश्रम, वृद्धाश्रम,आदिवासी पाडे, अंध,अपंग कर्णबधिर विद्यालयांमध्ये गुरुप्रसाद दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत आहे. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रतिनिधी सेवेकरी ठिकठिकाणी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करीत आहेत.
