नाशिक – गडकिल्ल्यांसाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यात प्राचीन धार्मिक परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पाळल्या जातात. किल्ल्यामुळे प्रसिध्द असलेल्या बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील प्राचीन परंपरा असलेला रासक्रीडा उत्सव हा त्यापैकीच एक. सात ऑक्टोबर रोजी हा रासक्रीडा उत्सव होणार आहे.

श्री उद्धव महाराज यांची समाधी असलेल्या मुल्हेरमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेला आणि आजही सुरू असलेला रासक्रीडा उत्सव म्हणजे मुल्हेरच्या सांस्कृतिक वैभवातील मानाचा शिरपेच आहे. शास्त्रीय संगीतावर आधारित असणारे उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे तसेच ब्रज भाषेतील भजन हे खास वैशिष्ट्ये असलेला हा उत्सव पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून भक्त येतात.

रासक्रीडा परंपरेविषयी आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार कृष्णभक्त राजा मयूर ध्वजाने श्रीकृष्णाच्या दर्शनापासून मुल्हेर येथे हा उत्सव साधारण इ.स. पूर्व ३००० मध्ये सुरु केला. आणि श्री उद्धव महाराजांचे गुरु श्री काशीराज महाराज यांनी इसवी सन १६४० मध्ये रासक्रीडेला पुनरुज्जीवन दिले. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे साधारण ३७८ वर्षापासून अखंडपणे ही परंपरा मयूरनगरी मुल्हेरमध्ये चालू आहे.

सात ऑक्टोबर रोजी मुल्हेर येथील श्री उद्धव महाराज समाधीसमोर असलेल्या १४ फूट रास स्तंभावर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी रासचक्र चढविण्यात येईल. रासक्रीडेची सुरुवात ही रासचक्राच्या बांधणीपासून सुरू होते. सुमारे २८ फूट व्यासाचे चक्र बांधून दोरीच्या साहाय्याने विणले जाते. त्यात केळीची पाने आणि झेंडूची फुले लावून चाकाची सजावट केली जाते. हे चाक संपातकाळी म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या साक्षीने रासस्तंभावर चढविले जाते. यावेळी उपस्थित भाविक “श्री उद्धव महाराज की जय” असा नामघोष करत क्षणार्धात चाक रास स्तंभावर चढवितात.

रासाचे चाक चढविल्यानंतर रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला कृष्ण आणि इतरांना राधिका, गोपिका बनवून श्रीकृष्णाच्या नामघोषात राम शाळेतून हजारो लोकांच्या उपस्थितीत समाधी मंदिरात नेले जाते. साधारण रात्री नऊ वाजता आरती करून कार्यक्रमास सुरुवात होते. तब्बल ११ तास म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत रासाच्या चाकाखाली अनेक रागदारीतील १०५ पदे गायली जातात. ही पदे अहिराणी, हिंदी, गुजराती, ब्रज आणि संस्कृत भाषेत आहेत. यात केवळ भक्तीरूपदर्शक भजने नाहीत तर लोक व्यवहार, निसर्ग वर्णन संवाद, सौंदर्य मनोविचार हे देखील आहेत. प्रत्येक पदामध्ये असलेला अर्थ व वर्णन पाहता मोठा ग्रंथ तयार होईल. या पदांमध्ये फक्त नवरसांचे नाही तर निसर्गाचे देखील वर्णन आढळते. पदातील शेवटची भैरवी गातांना सगळ्यांचे डोळे भरून येतात आणि त्यानंतर काही क्षणात रासाचे चक्र रास स्तंभावरून खाली उतरविले जाते. कितीतरी संकटांना दूर करणारा हा आनंद एका रात्रीत मिळाला या अनामिक भावनेने प्रत्येक जण एकमेकांचा निरोप घेतो तो पुढच्या वर्षी एकत्र जमण्यासाठीच.

सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती भक्तराज महाराज, संस्थान प्रमुख किशोर महाराज, श्रीकांत महाराज, सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे, उद्धव महाराज सेवा समिती यांनी केले आहे.