नाशिक – शहरात एक ते दीड महिन्यापासून पावसाळापूर्व कामांचे कारण देऊन वारंवार खंडित केला जाणारा वीज पुरवठा पावसाला सुरुवात होत असतानाही कायम आहे. कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अनेक भागात तीन ते चार तास पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागल्याचे कारण महावितरणकडून दिले जात असले तरी हे अघोषित भारनियमन असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. मोठ्या क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे एकतर तांत्रिक दोष अथवा अघोषित भारनियमन असण्याची साशंकता व्यक्त करीत वीज ग्राहक समितीने याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणकडून विविध कामे हाती घेतली जातात. त्यासाठी वेगवेगळ्या भागात वीज पुरवठा सातत्याने खंडित केला गेला. पावसाला सुरुवात होत असतानाही वीज पुरवठा खंडित होण्याची श्रृंखला कायम राहिली. मान्सूनपूर्व पावसामुळे सध्या प्रचंड उकाडा जाणवत होता. सोमवारी पारा ३४.९ अंशावर असला तरी वातावरणात शुष्कता जाणवत होती. या परिस्थितीत ऐन दुपारी शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोडसह आसपासच्या भागात वीज गायब झाली.

हेही वाचा >>> “हे तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार”, अजित पवार यांची हतगड मेळाव्यात टीका

वादळी वारा, पाऊस नसतानाही गायब झालेली वीज अल्पावधीत येईल अशी आशा फोल ठरली. तीन ते चार तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. या संदर्भात वीज कंपनीकडून माहिती घेतली असता देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. एक ते दीड महिन्यांपासून महावितरण पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करीत आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी युध्दपातळीवर केलेल्या कामांची यादी मध्यंतरी देण्यात आली होती. पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर असूनही ती अद्याप पूर्ण झाली नसल्याचे वीज कंपनीच्या स्पष्टीकरणातून अधोरेखीत होते.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास वीज गायब झाली. काही भागात सायंकाळी सहा वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला. वीज नसल्याने नागरिकांसह व्यावसायिकांना तीन ते चार तास कमालीचा त्रास सहन करावा लागला. वीज खंडित झाल्यानंतर ती कधी पूर्ववत होईल, याची माहिती लघूसंदेशाद्वारे दिली जाते. मात्र यावेळी तशी माहिती दिली गेली नाही. महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याने वीज कंपनी दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित भारनियमन करीत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली.

हेही वाचा >>> नाशिक: कांदाप्रश्नी प्रहारचे मुंडन आंदोलन, केंद्राच्या धोरणावर टीका

चौकशी करा

अकस्मात विस्तीर्ण क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित होण्याशी देखभाल दुरुस्तीचा संबंध येत नाही. सोमवारी कॉलेज रोड, गंगापूर रोडमधील अनेक भागात कित्येक तास वीज गायब होती. देखभालीची कामे काही विशिष्ट वाहिन्यांची होतात. त्यांच्याशी संबंधित वीज रोहित्र बंद ठेवले जाते. ग्राहकांना लघू संदेशाद्वारे पूर्वसूचना द्यावी लागते. सोमवारी तसे काहीच घडले नाही. ग्राहकांना लघू संदेशही आले नाहीत. वीज गायब होण्यामागे तांत्रिक दोष असू शकतो. अशा प्रसंगी संदेश पाठविले जातात. मात्र तेही झाले नाही. त्यामुळे महावितरणने याची स्पष्टता करणे आवश्यक आहे. पुरेशी वीज उपलब्ध न झाल्यास वीज कंपनीला अकस्मात अघोषित भारनियमन करते. सोमवारी बत्ती गुल होण्यामागे नेमके काय कारण होते, याची मुख्य अभियंत्यांनी चौकशी करावी. – ॲड. सिध्दार्थ वर्मा (सोनी) (सचिव, वीज ग्राहक समिती)

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या उद्भवू नये म्हणून वाहिन्यांच्या सभोवतालच्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. कुठल्याही भागात दुरुस्ती वा तांत्रिक दोषामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास लघू संदेशाद्वारे ग्राहकांना पूर्वकल्पना दिली जाते. सोमवारी देखभालीच्या कामासाठी एका फिडरवरील काही भागातील वीज पुरवठा बंद ठेवला गेला. तत्पुर्वी, ग्राहकांना लघूसंदेशाद्वारे कल्पना दिली गेली. शहरात कुठल्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नाही. – ज्ञानदेव पडळकर (अधीक्षक अभियंता, नाशिक मंडळ, महावितरण)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unannounced load shedding in nashik city power cut in many areas for three four hours ysh
First published on: 06-06-2023 at 09:46 IST