नाशिक : येवला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाच्या कृतीवरुन टिकास्त्र सोडले आहे. अजित पवार गटाचे पदाधिकारी दिलीप खैरे हे भुजबळ यांचे निष्ठावान असून माणिकराव शिंदे यांनी खैरे यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

अजित पवार गटाचे पदाधिकारी दिलीप खैरे हे येवला येथे दर मंगळवारी येत असतात. मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेतात. ही बैठक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नसते. तर, शासकीय अधिकाऱ्यांची असते, असा आरोप माणिकराव शिंदे यांनी केला आहे. दर मंगळवारी दिलीप खैरे हे नाशिकहून येवला येथे येतात. त्यांनी बोलाविलेल्या बैठकीस महसूल, पोलीस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समितीमधील असे सर्व अधिकारी फाईल घेऊन उपस्थित असतात, याबद्दल शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मंत्र्यांना अधिकाऱ्यांची अशी आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे.

खासदार आणि आमदार यांनाही जर अशा प्रकारची आढावा बैठक घ्यावयाची असेल तर त्यासाठी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना निरोप द्यावा लागतो. असे इतके त्रांगडे असताना नाशिकहून येणाऱ्या व्यक्तीला जो मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा अधिकार कोणी दिला आणि अशा बैठकीला कोणत्या अधिकाराने अधिकारी उपस्थित राहतात, असा प्रश्न माणिकराव शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

सात ते आठ महिन्यांपासून सदर दिलीप खैरे नावाची व्यक्ती अशा प्रकारच्या बैठका येवला येथे घेत आहे. सर्व अधिकारी निमूटपणे त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. संबंधित व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली सुप्रिमो आहे काय ? अधिकाऱ्यांवर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कोणाचे दडपण आहे काय ? अधिकारी कोणाला घाबरतात ? खरे तर या प्रकरणात चूक प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे.

कोणी बैठक बोलावली म्हणून जावे काय ? अशा अनधिकृत बैठकांना उपस्थित राहणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. यापुढे अशा अनधिकृतपणे आयोजित बैठकांना अधिकारी उपस्थित राहिल्यास, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत, असा इशाराही माणिकराव शिंदे यांनी दिला. दर आठवड्याला बैठक घेऊन संबंधित व्यक्ती ठेकेदारीसंदर्भात वाटाघाटी करीत असल्याची शंकाही शिंदे यानी व्यक्त केली.