जळगाव – जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा धक्का दिला होता. त्यांच्यासोबत बरेच तोलामोलाचे पदाधिकारी पक्ष सोडून गेले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या निष्ठावानांची वर्णी लावण्याचे पाऊल शरद पवार गटाने आता उचलले आहे. त्या माध्यमातून पक्ष सोडून गेलेल्यांना चपराक देण्याचा प्रयत्न एक प्रकारे करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लगेच अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयारी केली होती. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जोरदार विरोध केल्याने पक्षश्रेष्ठी अनुकूल असतानाही त्यांचा पक्ष प्रवेश बारगळला होता. यथावकाश, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला. त्यामुळे देवकर यांच्या वाटेतील अडथळे आपोआप दूर झाले. याशिवाय, कोणी कुठेही गेले तरी मी शरद पवार यांची साथ सोडून कुठेच जाणार नसल्याची प्रतिज्ञा करणारे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला होता. देवकर आणि डॉ. पाटील यांच्यासारख्या दिग्गजांसोबत त्यांचे समर्थक असलेले अनेक पदाधिकारीही पक्ष सोडून गेले होते.
पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतीची आशा मावळल्यानंतर शरद पवार गटाने आता झाले गेले गंगेला मिळाले, असे म्हणत पुन्हा नव्या दमाने पक्ष बांधणीला प्राधान्य दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आपण कुठेही कमी पडायला नको, हा त्या मागचा मुख्य उद्देश देखील आहे. ज्याची सुरूवात जळगाव ग्रामीणमधील धरणगाव तालु्क्यापासून करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे यापूर्वीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी हे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक होते. ते अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांच्या जागेवर संजय पाटील पिंपळेकर यांची नियुक्ती झाली आहे. पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाने केला आहे.
याशिवाय, जिल्हा उपाध्यक्ष पदावर पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, महिला तालुकाध्यक्षपदी सोनवद येथील माजी सरपंच आशा पाटील तसेच तालुका कार्याध्यक्ष पदावर पक्षाचे सक्रिय सदस्य बांभोरी येथील हितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्ज्वल पाटील, धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रा आकाश बिवाल, घनःश्याम कुंभार, मोहन पाटील, दिनेश भदाणे आदी उपस्थित होते.