नाशिक – दिवाळीत सर्वच दिवस हे खरेदीसाठी शुभ मानले जात असले तरी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी अधिक खरेदी केली जात असल्याने या दोन दिवसात शहरात दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी अधिक प्रमाणावर झाली. याशिवाय सदनिका, भूखंडांचे व्यवहारही झाले. सोने, चांदी उच्चांकी स्तरावर असतानाही लगीनसराईमुळे अनेकांनी या दोन दिवशी खरेदीला प्राधान्य दिले. एकूणच कित्येक कोटींची उलाढाल या दोन दिवशी झाल्याचा अंदाज आहे.

याच महिन्यात दसऱ्याला शहरात वाहन आणि मालमत्ता खरेदी सुसाट झाली होती. त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या खरेदीवर त्याचा परिणाम होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु, तसा कोणताही परिणाम बाजारपेठेत जाणवला नाही. नागरिकांनी उत्साहाने वाहन, सदनिका, दागिने, इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदीवर भर दिला. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दिवशी अधिक प्रमाणावर खरेदी केली जाते. प्रत्येक दिवाळीत येणारा अनुभव व्यावसायिकांनी यावेळीही अनुभवला.

जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे वाहन खरेदीला वेग आल्याचे दसऱ्यालाही दिसले होते. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशीही तसेच चित्र राहिले. या दोन दिवसात १४०० पेक्षा अधिक चारचाकी वाहनांची आणि सात हजारपेक्षा अधिक दुचाकींची विक्री झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे वितरकांनी आनंद व्यक्त केला आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठीही हे दोन दिवस फायद्याचे गेले. दोन दिवसात दोनशे सदनिकांचा व्यवहार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून सोने, चांदीचे दर चढे असले तरी त्याचा फारसा परिणाम सराफ बाजारावर जाणवला नाही. मागील काही मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याकडे कल कायम राहिला. लक्ष्मीपूजनच्या दिवशीही ग्राहकांचा प्रतिसाद कायम राहिला. दिवाळीनंतर लगीनसराई सुरु होणार असल्याने ग्राहकांकडून त्या अनुषंगाने दागिने खरेदीला प्राधान्य देण्यात आले. सोने – चांदीचे वाढते दर पाहता सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही अनेकांनी खरेदी केली. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर ७५ टक्क्यांनी तर चांदीचे दर ६३ टक्क्यांनी वाढले. मंगळवारी लक्ष्मीपूजनासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. याविषयी राजापूरकर सराफी पेढीचे चेतन राजापूरकर यांनी माहिती दिली. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत आहे. आंतरराष्ट्रीय अस्थिर परिस्थितीमुळे औद्योगिक विकासाचा दर मंदावला आहे. त्यामुळे काहींनी गुंतवणूक म्हणुन सोने, चांदीला प्राधान्य दिले आहे. यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढले असतानाही मागणी कायम आहे. चांदीचा तोरा कायम आहे. पुढील काही काळ अशीच परिस्थिती राहणार असून सोने दीड लाखाच्या घरात तर चांदी दोन ते सव्वा दोन लाखाच्या घरात पोहचेल, असा अंदाज राजापूरकर यांनी व्यक्त केला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे दर चढे होते. चोख सोन्यासाठी रुपये १,२९ ८०० अधिक जीएसटी तर २२ कॅरेटसाठी एक लाख १९,८०० तसेच चांदीसाठी एक लाख ७५ हजार अधिक जीएसटीचा दर राहिला. दिवाळीनंतर लग्नसराईस सुरूवात होत आहे. यंदा या कालावधीत ७० मुहूर्त आहेत. या अनुषंगाने सोन्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसुत्र, बांगडी, पाटली, ठुशी पारंपरिक दागिन्यांसह चांदीच्या वस्तू तयार करण्यात येत आहेत. तसेच गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे राजापूरकर यांनी नमूद केले.

दिवाळीत होणाऱ्या गृह, वाहन, दागिने खरेदीवर वाढत्या महागाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन दिवशी अधिक खरेदी केली जाते. या दोन दिवसात कित्येक कोटींचे व्यवहार झाले. जीएसटी कपातीचा निर्णय वाहन वितरक आणि बांधकाम व्यावसायिकांना लाभदायक ठरला आहे.