जळगाव – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात सध्या महिन्यातून केवळ तीन वेळा, तेही तासभर पाणी मिळते. त्यामुळे दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी भटकावे लागते.

गावाचा पाणीप्रश्न न सोडविल्यास नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहा जूनला घागर मोर्चा काढण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नशिराबादची लोकसंख्या लाखापेक्षा अधिक आहे. शहराच्या आजूबाजूला असलेल्या जलस्त्रोतातून शहराची तहान भागेल इतका साठा असूनही ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या ग्रामस्थांना १२-१२ दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे.

हेही वाचा – कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन

वाघूर नदीवरील बेळी गावात असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच मुर्दापूर धरणाजवळील पाणीपुरवठा योजना, पेठ भागातील विहीर याद्वारे ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळू शकते, तसेच शेळगाव येथून केलेली पाणीपुरवठा योजना निव्वळ वीज देयक थकल्याने बंद आहे. शेळगाव बॅरेजमध्ये चांगला साठा असून, तेथील योजना नशिराबाद शहरास पाणीपुरवठा करण्यास सक्षम आहे. थकलेले वीज देयक भरून पुरवठा सुरू करावा आणि ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, असे राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा – जळगाव : अबब… स्टेट बँक शाखेतील सोने चोरीचा आकडा साडेतीन कोटींवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज वितरण कंपनीकडे नगरपरिषदेचे आणि तत्कालीन ग्रामपंचायतीचे लाखो रुपये घेणे बाकी आहे. सर्व येणे घेऊन वीज देयक दिल्यास शेळगाव बॅरेजमधून पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल. पाच जूनपर्यंत नशिराबाद शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सहा जूनला सकाळी ११ वाजता नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे