नाशिक : उन्हाचा तडाखा सहन करत पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या पाणी टंचाईने गंभीर स्वरुप धारण केले आहे. ६६ गावे आणि ५१ वाड्यांना ५७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ४६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील जवळपास सव्वा लाख नागरिकांना टँकरने पाणी दिले जात आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील काही तालुक्यांना दरवर्षी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. टळटळीत उन्हाचे चटके बसू लागल्यानंतर अनेक भागातून टँकरची सुरू झालेली मागणी पावसाळ्याच्या तोंडावरही थांबलेली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरून ग्रामीण भागातील टंचाईच्या संकटाची व्याप्ती समोर येते. टंचाईची सर्वाधिक झळ माजीमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाला बसली आहे. या तालुक्यातील २९ गावे, १५ वाड्यांना २० टँकरने ५२ फेऱ्यांमार्फत पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

हेही वाचा >>> नाशिक : पावसाला विलंब झाल्यास शहरात पाणी कपात, जिल्ह्यातील धरणांमध्ये २६ टक्के जलसाठा

नांदगाव, नाशिक, निफाड, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता उर्वरित सर्व तालुक्यात कमी-अधिक संख्येने टँकर सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात सात गावे आणि आठ वाड्यांना नऊ टँकरने पाणी पुरविले जात आहे. बागलाण तालुक्यात सात गावे-वाड्या (चार टँकर), चांदवड ११ (सहा टँकर), देवळा पाच (तीन), इगतपुरी १९, (पाच), पेठ सात (पाच), सुरगाणा आठ (चार), सिन्नर एक वाडीसाठी(एक) असे टँकर सुरू आहे. पावसाळा लांबल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होऊ शकते. गावांना पिण्याचे पाणी देण्यासाठी ५७ टँकरद्वारे दररोज १३६ फेऱ्या मारल्या जात आहेत. एक लाख २२ हजार ७०१ लोकसंख्येची तहान टँकरवर भागविली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४६ विहिरी अधिग्रहित

ग्रामीण भागात टंचाईची धग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ४६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. त्यात गावांना पाणी देण्यासाठी ३० तर, टँकर भरण्यासाठी १६ विहिरींचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. बागलाण तालुक्यात चार, चांदवडमध्ये एक, दिंडोरीत चार, देवळा सात, नांदगाव पाच, पेठ नऊ, सुरगाणा चार, येवला तालुक्यात एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.