नाशिक – शहरात बुधवारी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने काही भागात कमी दाबाने तर, काही ठिकाणी कमी वेळ पाणी पुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सध्या पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. सततच्या पावसामुळे विद्युत प्रवाह बंद होण्यासह इतर काही तांत्रिक अडचणींमुळे शहरातील काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून बहुतांश भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाने कुठल्या विभागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे, याची माहिती दिली.
महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलशुध्दीकरण केंद्रांसह विविध जलकुंभांच्या ठिकाणी फ्लो-मीटर बसविण्यासह इतर अनुषंगिक कामे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय काही ठिकाणी पाण्याचे वेळापत्रक बदलण्यात येत आहे. परंतु, याची कोणतीही माहिती पाणी पुरवठा विभागाने दिलेली नाही. सलग तिसऱ्या दिवशी शहर परिसरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. याविषयी अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी, पावसामुळे ही आपत्ती ओढावल्याचे सांगितले. दोन ते तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पूर्ण दाबाने पाणी उचलता आले नाही. पाऊस थांबल्यास दोन ते तीन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.