लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: उन्हाळ्यात दुर्गम भागात टंचाईला तोंड द्यावे लागत असताना पेठ तालुक्यातील सातपुते पाड्यात पाणी प्रश्न सुटल्याचा जल्लोष होत आहे. सातपुतेपाड्याची ही समस्या तुषार मिस्त्री कुटुंबीय आणि २००४ च्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या आर्थिक योगदानातून सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने सोडविली.

या पाणी प्रकल्पाचे उदघाटन शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, स्मिता बच्छाव, प्रकल्पाच्या मदतकर्ते छाया आणि तुषार मिस्त्री, एसएनएफचे संस्थापक प्रमोद गायकवाड, सरपंच संदीप भोये यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रकल्पाला नाशिकच्या मिस्त्री कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या स्मरणार्थ आणि २००४ च्या आरटीओ बॅचच्या अधिकाऱ्यांनीही आर्थिक योगदान दिले. मिस्त्री यांच्या साहिल या मुलाचे तरुण वयात निधन झाले. आपल्यावर झालेला हा आघात सहन करून मुलाच्या स्मरणार्थ मिस्त्री कुटुंबियांनी एसएनएफच्या जलाभियानातील सातपुतेपाडा या गावासाठी मदत करण्याचे ठरविले. त्यांच्या या निर्णयाने समाजात एक आदर्श पायंडा पाडला असून त्यातून आज एका दुर्गम भागातील शेकडो लोकांच्या दारात पाणी पोहोचले. ही एक क्रांतिकारी घटना असल्याचे प्रतिपादन पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले. आरटीओ अधिकाऱ्यांचे समाजासाठीचे उत्तरदायित्वही वाखाणण्याजोगे असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच आम्ही ही मदत केली, असे साहिलचे वडील तुषार मिस्त्री यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक: वीज कोसळून बालकाचा मृत्यू, नैसर्गिक आपत्तीत तीन जण जखमी

याप्रसंगी गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून गावात पाणीआल्याचा आनंदोत्सव साजरा केला. गावातील वितरण व्यवस्थेतील नळ सुरु करून या जल योजनेचे उदघाटन झाले. याप्रसंगी आरटीओ अधिकारी राहूल कदम, अमृता कदम, मनिषा निमसे, संदीप निमसे, उज्वला बोधले आदी उपस्थित होते.

दोन, अडीच किलोमीटरची पायपीट बंद

पेठ तालुक्यातील जुनोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सातपुतेपाडा गेली अनेक वर्षे पाणी टंचाईला तोंड देत होते. ग्रामस्थांना उन्हाळ्यात दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत पाण्याच्या शोधात भटकण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. दुर्गम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देणाऱ्या एसएनएफ संस्थेपर्यंत या गावाची माहिती आली आणि संस्थेने पाहणी करून या गावाचा पाणी प्रश्न हाती घेतला. एसएनएफच्या जलतज्ज्ञांनी गावाजवळ पाण्याचा एक स्त्रोत शोधून तिथे गावकऱ्यांनी श्रमदानातून विहीर खोदली. तिथून गावात पाणी आणण्यासाठी जल वाहिनी, वीजपंप आणि टाकीची गरज होती. यासाठी एसएनएफने आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत साहिल मिस्त्री यांच्या स्मरणार्थ नाशिकच्या तुषार मिस्त्री कुटुंबीयांनी आणि २००४ आरटीओ अधिकाऱ्यांच्या तुकडीने या साहित्यासाठी आर्थिक मदत केली. गावातील पाण्याच्या टाकीची जबाबदारी जुनोठी ग्रामपंचायतने उचलली आणि अशा रीतीने एसएनएफच्या माध्यमातून अजून एक गाव पाणी टंचाई मुक्त झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply in satpute pada in memory of child social contribution of mistry family mrj
First published on: 05-06-2023 at 15:17 IST