लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४१ अंशांपार गेला आहे. सध्या उष्णतेच्या झळांनी जिल्हा कासावीस झाला आहे. शहरासह जिल्ह्यात चार तालुक्यात टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मेपूर्वीच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अजून वर्षभर पुरेल एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाच्या मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव पडण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला असून, त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने जूननंतरही टंचाई जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी जिल्ह्याचे सरासरी तापमान ४५ अंशापेक्षा अधिक राहते. मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाचा फारसा तडाखा जाणवला नाही. मात्र, एप्रिलमध्ये तापमानाचा पारा दिवसागणिक चढत आहे.

हेही वाचा… नाशिकमधील महिला मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची उपस्थिती?

जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि खेडीढोक, बोदवड तालुक्यातील एनगाव, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा येथे टँकर सुरू झाले आहेत. जिल्ह्यात विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा… नाशिक : पायाभूत विकासातील असमतोलाचे आव्हान

त्यात जामनेर तालुक्यात आठ, भुसावळ आणि भडगाव तालुक्यात प्रत्येकी एक आणि पारोळा तालुक्यात दोन विहिरी अधिग्रहीत, तर जळगाव तालुक्यातील मौजे लोणवाडी बुद्रुक येथे एक आणि चाळीसगाव तालुक्यातील मौजे हातगाव भिल्ल वस्ती येथे एक, अशा दोन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.