शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत हे सध्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक क्रिकेट सामान्यांच्या स्पर्धेचे उद्धाटन केले. याप्रसंगी त्यांनी काही शाब्दिक टोलेबाजीही केली.

“ हे लहान मैदान आहे आपल्याला मोठ्या मैदानात लवकरच खेळावं लागणार आहे आणि ते मैदान आपल्याला जिंकायचं आहे. पण त्या मैदानासाठी या मैदानातील पोरं फार महत्त्वाची आहेत. ही सगळी जी मुलं आहेत, हीच आपली पुढली शिवसेनेची पिढी आहे. शेवटी खेळाच्या माध्यामातूनच तरुण पिढीला प्रेरणा मिळत असते. खिलाडुवृत्ती जागी होते, जी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राजकारणात होती.” असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनीही बॅटींग करून या स्पर्धेचे उद्धाटन केले. तसेच, अशीच फटकेबाजी तुम्ही चालू ठेवा, मैदानावर आणि राजकारणातही. अशा शब्दांमध्ये स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. नाशिकमधील संघटना अखंड ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही दिवसांनी नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. त्याच्या पुर्वतयारीसाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. याआधी जून महिन्यात ५० आमदार फोडल्यानंतर नाशिकमध्ये ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या आकड्याच्या साधर्म्यावरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये हा दुसरा झटका शिंदे गटाने दिला आहे.