जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत धनत्रयोदशीला मोठी घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. लक्ष्मीपूजनाआधी सोमवारी सकाळी पुन्हा घसरण झाल्याने दोन्ही धातुंचे दर आणखी घसरले. बाजारात त्यामुळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
गेल्या आठवड्यात सोने, चांदीच्या दरात झालेल्या उच्चांकी दरवाढीनंतर आता किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. जागतिक स्तरावरही सोमवारी सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. सोमवारी सकाळच्या व्यापार सत्रात एमसीएक्स बाजारातही सोन्याची घसरण झाली. भू-राजकीय आणि आर्थिक चिंता तात्पुरती कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये नफा-वसुली दिसून आली. दरम्यान, सोन्याचे भाव अजुनही जास्त असले तरी दिवाळीत अनेक लोक सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. दिवाळीत मौल्यवान धातू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यावर्षी सोन्याच्या किमती वाढल्यामुळे बरेच ग्राहक हलक्या वजनाचे दागिने किंवा नाणी निवडू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तथापि, सोमवारच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
तज्ञांचे म्हणणे आहे, की दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत थोडीशी घट होऊ शकते. सोन्याच्या किमतीत अलीकडील वाढ आता थांबू शकते. कारण मोठ्या सणांनंतर भौतिक मागणी कमी होण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदार जागतिक आर्थिक संकेत आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या विधानांवर देखील लक्ष ठेवतील. सोन्यातील सध्याची तेजी आता स्थिर होऊ शकते. या आठवड्याच्या मध्यापर्यंत भौतिक मागणी कमी होईल, ज्यामुळे किमतींमध्ये थोडीशी घसरण होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदार या आठवड्यात अनेक प्रमुख जागतिक डेटावर बारकाईने लक्ष ठेवतील, ज्यात चीनी आर्थिक डेटा, यूके चलनवाढ दर, विविध देशांमधील पीएमआय डेटा, यूएस ग्राहक विश्वास निर्देशांक आणि फेडरल रिझर्व्हच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. जळगाव शहरात शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी २७८१ रूपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३२ हजार ३५५ रूपयांपर्यंत खाली आले होते. लक्ष्मीपुजनाच्या आधी सोमवारी सकाळी पुन्हा बाजार उघडताच ७२१ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख ३१ हजार ६३४ रूपयांपर्यंत घसरले.
चांदीत ५१५० रूपयांनी घट
जळगावमध्ये शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल ५१५० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ७५ हजार रूपयांपर्यंत खाली आले होते. लक्ष्मीपूजनाच्या आधी सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५० रूपयांची घट झाल्याने चांदी एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत खाली घसरली.