जळगाव – जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणारे शेतकरी पुरते खचले आहेत. १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अजुनही जूनमधील नुकसानीची आर्थिक मदत मिळालेली नाही. लोकप्रतिनिधी मात्र मदतीचा हात देण्याऐवजी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात केवळ खरीप हंगामातच नाही तर उन्हाळ्यातही चक्रीवादळासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने एप्रिल आणि मे महिन्यांत ८०९ गावांमधील केळी, मका, पपई आणि इतर फळपिकांचे ११ हजार ५९३ हेक्टरचे नुकसान होऊन २४ हजार ७३३ शेतकरी बाधित झाले होते. त्यानंतर जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तरी चक्रीवादळासह पावसाने तडाखा देणे सुरूच ठेवल्याने सुमारे ४७७२ हेक्टरवरील केळीसह इतर फळपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अपवाद फक्त जुलै महिना ठरला. ऑगस्टमध्येही अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यामुळे सुमारे ८०२८ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी, कांदा पिकाचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात सुद्धा आतापर्यंत ८० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पैकी उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे ११ हजार ५९३ हेक्टरचे नुकसान झाले होते. प्रत्यक्षात, शासनाकडून एप्रिलमधील नुकसानीच्या मदतीचे चार कोटी ५३ लाख १७ हजार आणि मे मधील नुकसानीच्या मदतीचे १९ कोटी ९६ लाख १६ हजार रूपये अनुदान मंजूर होऊन शेतकऱ्यांना वितरीत झाले आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबरच्या कालावधीत आतापर्यंत ९२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे. परंतु, पीक नुकसानीचे अहवाल पाठविण्यात आणि त्यांना शासनाकडून मंजुरी मिळण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर मिळणे मुश्किल झाले आहे. तशात, शासनाने आधीच्या नुकसानीची मदत देण्याऐवजी नंतरच्या महिन्यातील मदतीचे अनुदान देण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील १० हजार १५८ शेतकऱ्यांना अजुनही जूनमधील ४७७१ हेक्टरवरील पीक नुकसानीची मदत मिळू शकलेली नाही.

ई- केवायसीची अडचण

शासनाकडून वेळवर पीक नुकसानीच्या मदतीचे अनुदान मिळत नसताना, ई- केवायसीच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते जमा झाले नसल्याचेही प्रकार घडले आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अनेकांना तर मे महिन्यापासूनची मदत मिळालेली नाही. संबंधित शेतकरी त्यामुळे हतबल झाले आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन १७ हजार ३३२ शेतकरी बाधित झाले होते. त्यासाठी ९.८६ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. जूनचे प्रलंबित अनुदानही लवकरच मिळेल. –गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव)